महापालिका निवडणुकीआधी ठाकरे गटाला खिंडार, हे बडे नेते भाजपमध्ये जाणार
उद्धव ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि बहुजन विकास आघाडीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये शहराचे समन्वयक, युवासेना पदाधिकारी आणि इतर महत्वाचे कार्यकर्ते समाविष्ट आहेत.

आगामी महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच आता वसई-विरारच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे. आमदार स्नेहा दुबे पंडीत यांनी बहुजन विकास आघाडीसह ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. बहुजन विकास आघाडीसह उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे वसई-विरार परिसरात भाजपची ताकद वाढणार आहे.
आज दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे भाजपला वसई-विरारमध्ये एक मजबूत राजकीय बळ मिळालं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये शहर समन्वयक निलेश भानुसे, युवासेनेचे तालुका अधिकारी सुनील मिश्रा, उपतालुकाप्रमुख प्रकाश देवळेकर, युवासेनेचे उप जिल्हाधिकारी वैभव म्हात्रे आणि उपशहर प्रमुख योगेश भानुसे यांचा समावेश आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या विभागांमध्ये चांगलं काम आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे गटाची मोठी हानी झाली आहे.
याव्यतिरिक्त, बहुजन विकास आघाडीमधील महत्त्वाचे पदाधिकारी संतोष घाग आणि संतोष कनोजिया हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोन्ही पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेशाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. यामुळे भाजपला वसई-विरारमध्ये स्थानिक स्तरावर चांगला फायदा होईल असे बोललं जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची नावे
- निलेश भानुसे – शहर समन्वयक, ठाकरे गट
- सुनील मिश्रा – तालुका अधिकारी युवा सेना
- प्रकाश देवळेकर – उपतालुकाप्रमुख उबाठा
- वैभव म्हात्रे – उप जिल्हाधिकारी, युवा सेना
- योगेश भानुसे – उपशहर प्रमुख, उबाठा
- संतोष घाग – बहुजन विकास आघाडी
- संतोष कनोजिया – बहुजन विकास आघाडी
- आनंद पाटील – सामाजिक कार्यकर्ते
धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का
तर दुसरीकडे धाराशिवच्या राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ग्रामीण भागातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानले जाणारे ज्येष्ठ नेते आणि धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश विश्वनाथराव आष्टे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. प्रकाश आष्टे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यात काँग्रेससाठी काम करत पक्ष वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात काँग्रेसची मजबूत पकड होती. आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, आष्टे यांच्यासारखा अनुभवी शिलेदार काँग्रेसमधून गेल्याचा फटका पक्षाला निश्चितच बसणार आहे.
