
Bacchu Kadu Criticizes BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात चांगलं राजकारण रंगलं आहे.महायुतीत तर मोठा वाद उफळला आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातून भापजात मोठी इन्कमिंग होत आहे. याच इन्कमिंगमुळे आता महायुतीत मोठी खदखद पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे माजी आमदार शहाजीबापू पटाली यांनी अबला महिलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपाची वागणूक आहे, असे म्हणत खदखद व्यक्त केली आहे. त्यानंतर शिंदे यांच्या सर्वच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर महायुतीतील नाराजीनाट्य जगजाहीर झाले. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची नाराजी लक्षात घेऊनच, कधीकळी महायुतीचा भाग असलेल्या माजी मंत्र्याने शिंदे यांच्या पक्षाबाबत मोठं भाकित वर्तवलं आहे.
माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. सोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे भवितव्य खडतर असणार आहे, असे भाकित त्यांनी व्यक्त केले आहे. महायुती ही तीन पक्षांची युती आहे. पण भाजपा आपले वर्चस्व कुठेच सोडणार नाही. भाजपा चांगला दुष्मन असू शकतो. पर भाजपा पक्ष कधीच चांगला मित्र होऊ शकत नाही. भाजपा मित्रांसोबत बेईमानी करतो. भाजपाकडून दगाबाजी केली जाते, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली.
तसेच मित्रांना गरजेपुरते सोबत ठेवणे हाच भाजपाचा अजेंडा आहे. गरज संपली की भाजपा मित्रपक्षांना शत्रूसारखी वागणूक देते, असेही बच्चू कडू म्हणाले. एकनाथ शिंदे यांचे तसेच त्यांच्या शिवसेना पक्षाचे भवितव्य सांगताना बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उदाहरण दिले. जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाले. तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबतही होईल. जो पक्ष झेप घेतो. त्या पक्षाचे भाजपाकडून पंख छाटले जातात, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला.
दरम्यान, महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगल्यानंतर ही धुसफूस मिटवण्यासाठी महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.