‘नेमकं घोडं अडलं कुठं? तुम्ही… ‘, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक
राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता बच्चू कडू यांनी थेट इशारा दिला आहे.

सध्या राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणूक काळात महायुतीकडून शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सध्या महायुतीच्या नेत्यांकडून कर्जमाफीसंदर्भात सुरू असलेल्या वक्तव्यांमुळे कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर बोलताना पुन्हा एकदा माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
हा विषय आम्ही मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाणार आहोत. आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आहोत कर्जमाफी झाली पाहिजे अशी मानसिकता आहे, असं माणिकराव कोकाटे म्हणत आहेत, मग घोडं अडलं कुठे. तुम्ही घोषणा केल्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही, त्यामुळे व्याज माफ झालं नाही. त्यामुळे आता नवीन कर्ज शेतकऱ्यांना भेटत नाही, शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. तुम्ही घोषणा केली नसती तर त्यांनी कर्ज भरलं असतं, तुम्ही घोषणा केल्यामुळे ते आता कर्ज भरत नाहीत. आम्ही कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, काही झालं तरी बहेत्तर असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री नितेश राणे यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांच्या हिंदुत्वाचा विचार भाजपाने एकदा पक्का केला पाहिजे, काँग्रेसने ईदच्या निमित्ताने भेट दिली असती तर तुम्ही बोभाटा केला असता काँग्रेसचा धर्म बदलला असता. तुमच्या हिंदुत्वामध्ये मुसलमानांना काय स्थान आहे, बुद्धांना काय स्थान आहे? असा सवाल यावेळी बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी गंभीर आरोप केले आहेत, यावर देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती, असा दावा कासले यांनी केला आहे. यावर बोलताना प्रकरण गंभीर आहे, तपास झाला पाहिजे. मराठड्यात नवीन इतिहास होऊ नये हीच अपेक्षा आहे. बीडमधून नवीनच काहीतरी ऐकायला येतं आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
