Karuna Sharma : करुणा शर्मांना दिलासा, धनंजय मुंडेंना झटका
आधीच राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोर्टात करुण शर्मा यांना दिलासा मिळाला आहे.

सध्या राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना आणखी एक धक्का बसला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. आता वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना महिना पोटगीपोटी 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुण शर्मा यांचा दावा होता. त्यासाठी मागच्या काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या.
कौटुंबिक विषय असल्याने त्यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दाद मागितली होती. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दर महिना पोटगीपोटी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वारंवार काही गोष्टी समोर आणल्या होत्या. त्याचवेळी त्या कायदेशीर लढाई सुद्धा लढत होत्या. आज त्यांना थोडा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल.
राजकीय संकट काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आलं. वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप राजकीय विरोधकांनी केला. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप झाला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चाच उघडला आहे.
राजीनाम्याची मागणी
त्या सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. नुकतीच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यांनी यासाठी धनंजय मुंडेंना जबादार ठरवत राजीनाम्याची मागणी केली.
