
MP Bajrang Sonawane: लोकप्रिय नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांची ही अचानक एक्झिट अनेकांच्या काळजाला चटका लावून गेली. अजितदादा आपल्यातून गेले यावर अजूनही अनेकांचा विश्वास नाही. अनेकजण या धक्क्यातून सावरले नाहीत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेच नाही तर इतर पक्षातील त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा या धक्क्यातून सावरणे अवघड जात आहे. त्यातच दादांच्या विमानाचा अपघात झाला की हा घातपात होता यावरही राज्यात मोठा खल सुरू आहे. मोठा वाद सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे.
अजितदादांच्या विमानात बॉम्ब?
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर मनमोकळं केलं. त्याचवेळी अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे अशी मोठी मागणी सोनवणे यांनी केली. दादांची अपघाताच्या दिवसाची सकाळपासूनची दिनचर्या, प्रक्रिया समोर आली पाहिजे. विमान घटनेचा क्रम पाहता, कोणी म्हणतं की स्फोट झाला. सकाळी 8:46 चं जे फुटेज दिसत आहे. ते मी पण बघितले. त्या फुटेजमध्ये काय दिसतंय. विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच स्फोट झाला. मला जेवढं कळतं, ठीक आहे विमान तिरपं झालं, क्रॉस झालं. पण जमिनीला टच होण्यापूर्वीच विमानात स्फोट झाला. कारण स्फोट झाल्यानंतर विमानाच्या इंजिनाकडील समोरचा भागातील लोक बाहेर फेकल्या गेले. त्यानंतर विमान जमीनाला लागलं आणि स्फोट झाला. दुसरा स्फोट झाला. त्यामुळे ही घटना काय असू शकते यावर संशय येणार नाही का? असा सवाल त्यांनी केला.
कदाचित दादांच्या विमानात बॉम्ब होता? की इंजिनाचा स्फोट झाला, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी विचारला आहे. मी काही एकदम निगेटीव्ह माणूस नाही. पण जे समोर दिसतंय, प्रथमदर्शनी जे दिसतंय त्यावरून मी हे बोलतोय. दादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. या संपूर्ण घटनेचा तपास सार्वजनिक करा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
9 तारखेनंतर बोलणार- रोहित पवार
तर आमदार रोहित पवार यांनी या सर्व प्रकरणी 9 तारखेनंतर बोलणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्यापर्यंत जी काही माहिती आली आहे. अजून काही माहिती आम्ही मागवत आहोत. एखादी घटना घडल्यावर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं फार महत्त्वाचं आहे. काही अनुत्तरीत प्रश्न आहे याविषयी संबंधित ज्या काही संस्था आहे, त्यांना आम्ही नक्कीच माहिती विचारू असे रोहित पवार म्हणाले.