बीडमध्ये चाललंय काय? महिला वकिलाला सरपंचासह इतरांची पाईप, काठ्यांनी बेदम मारहाण, अंग काळंनिळं पडलं
Female Lawyers brutally Assaulted : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, त्यानंतर खोक्या भाईचा दादागिरी असे अनेक प्रकार बीड जिल्ह्यातून समोर आले आहेत. एकमेकांविरोधात व्हिडिओची राळ उडवण्यात आली आहे. आता एका महिला वकिलाला झालेली अमानुष मारहाण काळजाचा थरकाप उडवणारी आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या, खोक्याची दादागिरी, इतर अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मारहाणीचे व्हिडिओंनी बीडमधील राजकीय गुन्हेगारी, दादागिरी समोर आली आहे. एकमेकांविरोदात व्हिडिओची राळ आपण सोशल मीडियावर अनुभवली आहे. आता बीडमध्ये पुन्हा एकदा गुंडाराज दिसून आला. एका महिला वकिलाला गावातीलच सरपंचासह इतर आरोपींनी काठ्या, पाईपने बेदम मारहाण केली. या मारहाणीने अंग काळंनिळं पडलं आहे.
किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण
घरासमोरील गिरणी आणि लाऊड स्पीकर बंद करा अशी विनंती या महिलेने गावातील सरपंचाकडे केली होती. त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. त्यानंतर तिला तू पोलिसांकडे तक्रार कर, असे सांगितले. मदत दूरच सतत त्रास होत असल्याने मग महिला वकिलाने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर संतापलेल्या सरपंचासह गावातील 10 पुरूषांनी या महिला वकिलाला बेदम मारहाण केली. काठ्या आणि जेसीबी पाईपाने एका शेतात नेत रिंगण करून अमानुष मारले. यात तिचे अंग काळंनिळं पडलं. या घटनेने पुन्हा एकदा बीडमध्ये चाललंय काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महिलेला अशी वागणूक देण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
महिला वकिलाची बाजू काय?
अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे ही घटना घडली. पीडित महिला वकिलाने तिची आपबिती टीव्ही ९ मराठीशी बोलताना मांडली. मंदिरावरील लाऊड स्पीकर, गावातील गिरणी यामुळे ध्वनी प्रदूषण होते. लाऊड स्पीकर बंद करण्याची विनंती तिने सरपंचाकडे केली होती. पण त्यांनी टाळाटाळ केली. संबंधित व्यक्तीने सुद्धा तिची बाजू ऐकली नाही. महिला वकिलाला डोकेदुखीचा त्रास होत होता. तिने लाऊड स्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. तिने मग पोलिसांना याविषयीची तक्रार दिली.
पोलिसांकडे तक्रार दिल्याने सरपंचासह त्याचे कार्यकर्ते महिला वकिलाच्या घरी आले. त्यांनी तिच्या आई-वडिलांना माफी मागायला लावली. पण हे प्रकरण तेवढ्यावर मिटले नाही. आरोपींनी महिला वकिलाला एका शेतात नेत काठ्या आणि जेसीबी पाईपने गोल रिंगण करत बेदम मारहाण केली. यात ती महिला वकील बेशुद्ध पडली. तिला दवाखान्यात नेण्यात आले. रात्री उपचार करून घरी पाठवून देण्यात आले. या मारहाणीमुळे तिला चालणे आणि बोलणे सुद्धा कठीण जात आहे. गावकऱ्यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
