कोण वाचवतंय आरोपींना? मस्साजोगमध्ये घाडामोडी वाढल्या, सुप्रिया सुळे थेट हेलिकॉप्टरने रवाना, गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
Massajog Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अडीच महिने उलटले आहेत. जनरेट्यापुढे कारवाईचा फार्स करून पोलीस यंत्रणा आणि प्रशासन आरोपींना रान मोकळं करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच कालपासून मस्साजोगवासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला अडीच महिन्याचा कालावधी लोटला. पण याप्रकरणात आकाचा आका अजून ही मोकाट असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आकाला पण आरोग्य ठीक नसल्याचे कारण पुढे देत व्हिआयपी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या सर्व प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मस्साजोगवासीयांनी सरकारला अल्टिमेटमच दिला आहे. तर अगदी थोड्यावेळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये
दरम्यान जनक्षोभ वाढला आहे. फरार कृष्णा आंधळेला अटक करा अन्यथा अन्नत्याग करू अशी भूमिका मस्साजोग ग्रामस्थांनी घेतली आहे. तर खासदार सुप्रिया सुळे या हेलिकॉप्टरने मस्साजोगमध्ये आता थोड्याच वेळात दाखल होत आहे. त्या देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत.




सुप्रिया सुळे यांच्याशी कोणत्या विषयावर चर्चा करणार याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. ज्या काही आमच्या अडचणी आहेत सुरुवातीचा घटनाक्रम, ग्राउंड लेव्हलला सुरू असलेली दहशत, गुंडगिरी, अपहरण खंडणी, खून हे कशामुळे आणि कुणामुळे चालू होतं या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत, असे ते म्हणाले. गावकऱ्यांच्या भूमिकेशी मी सहमत असतो, गावकरीचे निर्णय घेतील त्याच्यावर पुढील दिशा ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पवार कुटुंबियांचा मोठा आधार
माणुसकीच्या नात्याने वय झालेला असतांना शरद पवार हे भेटायला आले. दोन तास त्यांनी कुटुंबियांसोबत वेळ घालवला. दोन ते तीन वेळेस त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केला, दोन वेळेस पत्रव्यवहार केला या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे, अशी मागणी केली. रोहित दादा सुद्धा आले होते. त्यांनी शिक्षणासंदर्भात सुद्धा आमच्या कुटुंबियांशी चर्चा केली. आज सुप्रिया सुळे येत आहेत आमच्या ज्या काही अडचणी आहेत आम्ही त्यांना सांगणार आहोत. आम्ही सगळा घटनाक्रम आणि घटना झाल्यानंतर येथे जे काही गोष्टी घडल्या ते मांडणार आहोत, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.
कोण वाचवतंय आरोपींना?
घटना झाल्यानंतर आरोपीला कसं फरार केलं, गोरगरीब जनता संतोष अण्णाच्या अन्यायासाठी जे रस्त्यावर बसले होते त्यांना उठून घरी कस पाठवता येईल, आंदोलन मोडीत कसं काढता येईल यावर जास्त भर दिसला. आरोपी याच भागात असताना त्यांचे मोबाईल सुरू असताना त्यांना पकडण्यासाठी सक्तीचे प्रयत्न केले नाही, ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी घेतली.
महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा
महादेव मुंडे यांच्या पत्नीची भेट घेणार आहेत. ते तिथे जातील न्यासंदर्भात काय कारवाई करतील या संदर्भात प्रशासनाला सूचना करतील असं वाटतं, कोणाच्याही कुटुंबियांवर अन्याय झाला तर न्यायाच्या भूमिकेत आलं पाहिजे, सुप्रिया सुळे यांच्याकडून आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा आहे, असे देशमुख म्हणाले.