मुंबईकरांनो घाबरु नका, अख्ख्या शहरात सायरनचा आवाज घुमणार, काय नेमके घडणार ?
मागे नागरिकांचे मोबाईल अचानक नेहमीच्या रिंगटोन पेक्षा वेगळ्याच आवाजाने थरथरले तेव्हा लोकांचे काळीजही थरथरले होते. आता मात्र मुंबईकरांचे कान वाजणार आहेत. अहो मुंबईत सायरन वाजणार आहेत.

मुंबईत पूर्वी गिरण्यांचे भोंगे ऐकायला यायचे. त्यावरुन अनेक कामगारांच्या शिफ्ट सुरु व्हायच्या. लोक या आवाजाने कितीचा भोंगा वाजला त्यावरुन आपले दैनंदिन कामकाज सुरु करायचे. या भोंग्याचे आवाज गिरण्यांच्या संपानंतर १९८२ साली बंद झाले ते कायमचेच. आता गिरण्याच्या चिमण्या तेवढ्या मॉल संस्कृतीत हेरिटेज म्हणून रंगवलेल्या दिसत आहेत. काही गिरण्यांच्या चिमण्यांवर पिंपळादी झाडांनी डेरा टाकला आहे. तर अशा मुंबईत आता कित्येक दशकानंतर सायरनचा आवाज घुमणार आहे. त्यामुळे तुम्ही या आवाजाने घाबरुन जाऊ नका. तसा मुंबईकर लोकलच्या हॉर्नने सरावलेला असल्याने त्याला या मुंबईतील बांधकामांच्या ध्वनी प्रदुषणात भोंग्यांचा आवाज कितपत ऐकू येईल हा प्रश्नच आहे.
मुंबई शहरात आता सायरनची चाचणी केली जाणार असल्याचे मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे. फोर्ट परिसरातील जुने सचिवालय आणि क्रॉस मैदानाजवळील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतींवर बसविण्यात आलेल्या सायरनची येत्या ८ आणि ९ ऑक्टोबर २०२६ रोजी चाचणी घेण्यात येणार आहे. यादरम्यान मुंबईकरांना या सायरन चा आवाज ऐकू येणार आहे. मात्र, नागरिकांनी या सायरनचा आवाज ऐकून घाबरून जाऊ नये तसेच कोणताही गैरसमज करून घेऊन नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
माननीय महासंचालक ( नागरी संरक्षण, नवी दिल्ली ) यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटीक्स (C-DOT) यांच्या पथकाद्वारे प्रोटोटाईप सायरन उपकरण तयार करण्यात आले आहे. हे सायरन मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड इमारत, फोर्ट, मुंबई तसेच नागरी संरक्षण महाविद्यालय, क्रॉस मैदान, मुंबई येथील इमारतींवर बसविण्यात आले आहेत.ही सायरन चाचणी ही पूर्वनियोजित असून मुंबईत कोणतीही प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका निर्माण झालेला नाही. त्यामुळे, सायरनचा आवाज ऐकू आल्यास स्थानिक नागरिकांनी घाबरून जाऊ नये अथवा कोणताही गैरसमज करून घेऊ नये. नागरिकांनी सदर चाचणीसाठी प्रशासनास सहकार्य करावे आणि कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. तेव्हा घाबरुन जाऊ नका, कोणतेही संकट आलेले नाही असे पालिकेने म्हटले आहे.
