
देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. त्यात अनेक मान्यवरांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षी देशाच्या 131 मान्यवरांना हा सन्मान मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी हे पुरस्कार घोषीत केले जातात. आता साल 2026 साठी एकूण 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.डिसेंबर महिन्यात त्यांचं निधन झालं होते. तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे.
महाराष्ट्रात माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून काय प्रतिक्रीया येणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. कारण साल महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात जेव्हा उद्धव ठाकरे यांचे सरकार आले तेव्हा राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा चंगच बांधला होता.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीत यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला छळले होते. 2019 ते 2023 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल असताना कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या जागांची निवडणूक अडवून धरली होती.तसेच त्यांनी अनेकदा सरकारला अडचणीत आणले होते.
भगत सिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपुरुष महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल गैरउद्गगार काढले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानांमुळे मोठा वादंग झाला होता. कोश्यारी यांच्या विधानांमुळे ते कायमच वादग्रस्त राहिले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असेही विधान कोश्यारी यांनी केले होते. तसेच मुंबई शहरातून गुजराती लोक निघून गेले, त्यांनी पैसे काढून घेतले तर मुंबईचे काय होईल, मुंबईत पैसा शिल्लक राहील का? असेही विधान त्यांनी करुन मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले
याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता!
महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते!
छान! pic.twitter.com/5xrZ0u6c9q— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2026
शिवसेना नेते,खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.त्यात ते म्हणतात की महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे- भाजपचे सरकार बसवल्याबद्दल, या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले आहे. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान!अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी एक्सवर दिली आहे.