…आणि भंडाऱ्याच्या त्या राखेतही दोनशे जिवांची किलबिल! काय घडलं 14 दिवसात?

भंडाऱ्यातल्या शासकीय रुग्णालयातील आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने अवघा देश हादरला होता. | Bhandara hospital Fire

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 10:08 AM, 27 Jan 2021
...आणि भंडाऱ्याच्या त्या राखेतही दोनशे जिवांची किलबिल! काय घडलं 14 दिवसात?
Bhandara hospital Doctor

भंडाराभंडाऱ्यातल्या शासकीय रुग्णालयातील आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने अवघा देश हादरला होता. रुग्णालयात पहाटे लागलेल्या आगीत 10 निष्पाप कोवळ्या जीवांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण देशभरात या घटनेने थरकाप उडाला. नेते आले… पाहणी करुन गेले… सरकारी कारवाई झाली… अशा सगळ्या परिस्थितीतही गेल्या 14 दिवसांत याच रुग्णालयात 200 बालकांची किलबील ऐकायला मिळाली. (Bhandara Hospital Fire What happening In last 14 Days)

गेल्या 14 दिवसांत भंडारा रुग्णालयात 200 बाळांचा जन्म झाला. आगीच्या घटनेनंतरही लोकांचा या रुग्णालयावरील विश्वास कायम आहे, असं इथले डॉक्टर आणि रुग्णालयातले अधिकारी सांगतात. आगीची घटना ही सर्वांत मोठी चूक होती. परंतु ही चूक आता परत कधीच होणार नाही, असंही रुग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

‘तो’ NSICU अद्यापही बंदच…

आगीच्या घटनेच्या 14 दिवसानंतरही रुग्णालयातला तो NSICU अद्यापही बंदच आहे. दुसऱ्या इमारतीत स्मोक डिटेक्टर आणि आग प्रतिबंध सुविधा असलेल्या ठिकाणी आता NSICU तयार करण्यात आलाय. आगीच्या घटनेतून धडा घेत आता NSICU मध्ये 24 तास तीन परिचारीका तैनात असतात.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा

9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या आगीत 3 बालकांचा होरपळून तर 7 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 7 बालकांना वाचवण्यात यश आलं होतं. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीनं केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचं समोर आलं आहे.

7 जणांवर कारवाई, 6 जणांचं निलंबन

या प्रकरणात सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर डॉ. सुनिता बडे यांची तातडीनं बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुशील अबाते यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. नर्स ज्योती भास्कर, स्टाफ नर्स स्मिता आंबीददुलके आणि शुभांगी साठवणे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

भंडाऱ्याच्या दोषींवर थातूर-मातूर कारवाई…?

संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात राज्य सरकारची थातूरमातूर कारवाई केली का? असा प्रश्न आता समोर येत आहे. कारण, भंडारा इथल्या माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. प्रमोद खंडाते पुन्हा आरोग्य विभागात रुजू झाले आहेत. डॅा. खंडाते वर्धा जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य उपसंचालक डॅाक्टर संजीव जायसवाल यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. यामुळे राज्य सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

(Bhandara Hospital Fire What happening In last 14 Days)

हे ही वाचा :

भंडारा 10 नवजात बालक मृत्यू प्रकरणात राज्य सरकारची पोकळ कारवाई? निलंबित डॉक्टर पुन्हा कामावर रुजू

Bhandara Hospital Fire : भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात अखेर मोठी कारवाई, सिव्हिल सर्जनसह 6 जणांचं निलंबन

भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

Bhandara Hospital Fire | “माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्या”, बाळांच्या आई आणि नातेवाईकांची आर्त हाक