लॉकडाऊनचा फटका, लाखमोलाची स्ट्रॉबेरी जनावरांना, महाबळेश्वरमधील शेतकरी हवालदिल

लॉकडाऊनचा फटका, लाखमोलाची स्ट्रॉबेरी जनावरांना, महाबळेश्वरमधील शेतकरी हवालदिल

लॉकडाऊनमुळे पर्यटकांची आवडती स्ट्रॉबेरी चक्क जनावरांना चारा म्हणून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे (Strawberry become food of cow amid Corona lockdown).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 01, 2020 | 2:28 PM

सातारा : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीच्या हंगामाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. पर्यटकांची आवडती स्ट्रॉबेरी चक्क जनावरांना चारा म्हणून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे (Strawberry become food of cow amid Corona lockdown). काही ठिकाणी तर ही स्ट्रॉबेरी खड्डा खोदून गाडण्याची वेळ आली आहे. देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून पर्यटकांनी भरलेलं महाबळेश्वरमध्ये शुकशुकाट झाला आहे.

लॉकडाऊनमुळे मुंबईसह इतर राज्यांमध्ये पाठवली जाणारी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी अडचणीत सापडली आहे. हजारो टन स्ट्रॉबेरी सध्या शेतात पडून आहे. महाबळेश्वरला पर्यटन बंदी असल्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट आहे. पर्यायी शेतकऱ्यांना ही स्ट्रॉबेरी जनावरांना चारा म्हणून घालण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी तर खड्डा खोदून स्ट्रॉबेरी जमिनीत पुरावी लागत आहे.

कोरोनामुळे बाजारपेठ सुरु नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक हतबल झाला आहे. ग्राहक असूनही व्यापाऱ्यांपर्यंत स्ट्रॉबेरी पाठवण्यासाठी वाहनांची उपलब्धता नाही. त्यामुळे स्ट्रॉबेरी मालक आता मोठ्या संकटांत सापडला आहे, असं मत महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मुझफ्फर डांगे यांनी व्यक्त केलं.

महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी लाखो रुपये एकरी खर्च करून स्ट्रॉबेरीचं पीक घेण्यात येतं. मात्र, आता हाच शेतकरी कोरोना व्हायरस आणि अवकाळी पावसामुळे दुहेरी संकटात सापडला आहे. स्ट्रॉबेरी पिकाला कोरोना व्हायरसच्या संकटामुळे बांधावरच फेकण्याची वेळ आली आहे. हीच स्ट्रॉबेरी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 400 ते 500 रुपये प्रतिकिलो विकली जात होती. मात्र, आता याच स्ट्रॉबेरीला फुकटही कोणी घेऊन जायला तयार नाही.

परिपक्व झालेली स्ट्रॉबेरी ही वेळेत न तोडल्यामुळे ती जागेवरच सडून जात आहे. चार दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तर महाबळेश्वर-पाचगणीमधील स्ट्रॉबेरी शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. ही स्ट्रॉबेरी वेळेत तोडली गेली नाही आणि बाजारात विकली गेली नाही तर 5 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना कोट्यावधी रुपयांचा मोठा फटका बसणार आहे.

Strawberry become food of cow amid Corona lockdown

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें