मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा माईंड गेम; ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्या नेत्यावर सर्वात मोठी जबाबदारी
भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. बीएमसी निवडणुकीसाठी भाजपकडून एक नवी समिती तयार करण्यात आली आहे.

आनंद पाडे, प्रतिनिधी : राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीचा देखील समावेश आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता सर्व राज्याचं लक्ष सध्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलं आहे. मुंबई महापालिकेमध्ये कोणची सत्ता येणार? महायुती की महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार याबाबत सर्वांच्याच मनामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. बीएमसी निवडणुकीसाठी भाजपकडून एक नवी समिती तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपचे नेते हाजी अरफात शेख यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते या यादीमधील एकमेव मुस्लिम चेहरा आहेत.
बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती अधिक आक्रमक केली आहे. याच अनुषंगाने भाजपने एक 19 सदस्यांची महत्त्वपूर्ण समिती गठित केली आहे, ज्यामध्ये मुंबईतील ज्येष्ठ व सक्रिय नेत्यांसह आमदारांचाही समावेश आहे.
या समितीची खासियत म्हणजे भाजपचे मुस्लिम नेते हाजी अरफात शेख यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. हाजी अरफात हे केवळ महाराष्ट्र भाजपचे झुंजार नेतेच नाहीत, तर या यादीतील एकमेव मुस्लिम प्रतिनिधी आहेत. पक्षाच्या “सबका साथ, सबका विकास” या धोरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हाजी अरफात शेख यांना मुस्लिम बहुल भागांमध्ये संवाद आणि जनसंपर्क बळकट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की भाजप आता मुंबईत सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याची रणनीती आखत आहे. हाजी अरफात यांची सक्रियता आणि जमीनशी असलेली मजबूत पकड लक्षात घेता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्यासोबत आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्याचा अनुभव आणि जनसंपर्क भाजपसाठी उपयुक्त ठरणार आहे, आणि त्याचमुळे त्यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
