CM फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द, भाजप नेत्यांची मनोज जरांगेंना शेवटची वॉर्निंग काय?
भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप जरांगे पाटलांवर केला आहे. तसेच या प्रकरणी भाजपने जरांगे पाटलांनी अखेरचा इशाराही दिला आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे 27 ऑगस्टला मुंबईकडे आंदोलनासाठी निघणार आहेत. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ते मुंबईत जाऊन आंदोलन करणार आहेत. आता भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप जरांगे पाटलांवर केला आहे. तसेच या प्रकरणी भाजपने जरांगे पाटलांनी अखेरचा इशाराही दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जरांगे पाटलांच्या विधानामुळे भाजप नेते आक्रमक
मनोज जरांगे यांनी एका सभेत बोलताना ह्याआयचं देवेंद्र फडणवीस असं विधान केलं होतं. यावरून भाजप नेत्यांनी जरांगे पाटलांवर टीका करायला सुरुवात केली आहे. आमदार नितेश राणे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल ते अपशब्द वापरत असतील तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं.’
प्रसाद लाड यांची टीका
भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले की, ‘माझा सल्ला समजा किंवा इशारा समजा. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता. परंतु त्याच शिवछत्रपतींनी आपल्याला आया बहिणींचा सन्मान कसा करावा हे शिकवलं. त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्यापद्धतीने महिलांचा अपमान करताय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईंचा अवमान करताय, हे कदापि सहन केले जाणार नाही. ज्या शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांचे नाव तुम्ही का घेत नाही? असा सवालही लाड यांनी केला आहे.
परिणय फुकेंनी दिली शेवटची वॉर्निंग
आमदार परिणय फुके यांनी म्हटलं की, ‘पुढे त्यांनी असं खालच्या दर्जाचं किंवा वैयक्तिक वक्तव्य केलं तर याचं उत्तर देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सक्षम असतील. ही त्यांनी शेवटची वॉर्निंग समजावी.’
मी विधान मागे घेतो…
यावर जरांगे पाटील यांनी म्हटलं की, ‘सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त त्यांना काहीतरी कुरापती उकरून काढायच्या आहेत. जशी आज फडणवीस यांनी काहीतरी उकरून काढली. आरक्षण द्यायची वेळ आली तर आता आईला पुढे करत आहे. त्यांच्या आईला काही शब्द बोललो असेल तर ते मी ते विधान मागे घेतलेले आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मुंबईत येऊ द्यायचं नाही.’
