Ram Shinde : निलेश घायवळवरुन राम शिंदेंच जोरदार प्रत्युत्तर, रोहित पवारांवर खळबळजनक आरोप
सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याच्या विषयात राम शिंदे म्हणाले की, "गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुनावणी घेतली. चौकशी लावली आहे, लायसन देण्यासाठी कोणी मदत केली, ते निष्पन्न होईल. रोहित पवार खोटं बोलत आहेत. जग वेडं आणि मी शहाणा असा त्यांचा प्रयत्न आहे"

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निलेश घायवळ प्रकरणावरुन आमदार राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला आज राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “मला वाटतं आमदार रोहित पवारांनी जे आरोप केलेत ते बिनबुडाचे, आधारहीन, खोटे आरोप आहेत. ज्यावेळेस त्यांनी पासपोर्ट दिल्याचा आरोप केला, तेव्हा त्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत, चंद्रकांतदादा पाटील यांचा उल्लेख केला,पासपोर्ट देण्यासाठी सपोर्ट केला म्हणून. मूळात निलेश घायवळला पासपोर्ट 2020 साली मिळाला. निलेश घायवळ यांच्या नातेवाईकांनी सांगितलय की, हा पासपोर्ट मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फत प्रयत्न केले. दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी या आरोपांच उत्तर दिलं पाहिजे” असं राम शिंदे म्हणाले.
“आम्ही मदत केली नाही. पण चर्चेत, हायलाईटमध्ये राहण्यासाठी तुम्ही अशी नावं घेता, आता ते तोंडघाशी पडले आहेत. पासपोर्ट देण्याच्या विषयात रोहित पवार खोटं बोलले आहेत” असं राम शिंदे म्हणाले.
थेट तुमचं नाव घेतलं
सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात रोहित पवारांनी थेट तुमचं नाव घेतलं, तुम्ही सांगितलं म्हणून दिलं, या प्रश्नावर राम शिंदे यांनी उत्तर दिलं. “मला असं वाटतं की, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना काही अधिकार आहेत. कोणाला परवाना द्यायचा, नाही हा विषय त्यांच्या अधिकारक्षेत्रात येतो. ते स्वतंत्रपणे चांगलं काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी लायसन्स देण्याचा प्रश्नच नाही. कोणी मदत केली नाही. रोहित पवारांचे आरोप बिनबुडाचे आहेत” असं राम शिंदे म्हणाले.
त्यांच्यात कशावरुन बिनसलं?
“मी मंत्री होतो, मला पाडायचं होतं, तेव्हा ते पहिल्यांदा निलेश घायवळला जामखेडला घेऊन आले. त्यांच्या बैठका झाल्या, त्यांचे कैटुंबिक संबंध आहेत. त्यांच्यात कशावरुन बिनसलं, देण्या-घेण्यावरुन की रिअल इस्टेटवरुन त्यांनाच माहित. आमच्या भागात अनेक फोटो छापून आलेले, बातम्या आलेल्या. निलेश, सचिन घायवळ होते, म्हणून ग्रामपंचायती निवडून आल्या, असं रोहित पवार बोलल्याच्या बातम्या पेपरमध्ये आल्या” असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला.
हाणूनमारुन आमचे सदस्य पळवले
“त्यानंतर आमच्या पंचायत समितीच्या सदस्यांना कसं मारुन मुटकून हाणूनमारून कसं सभापती केलं हे तालुक्याला माहित आहे. त्यावेळी मी सुद्धा आरोप केलेले. हाणूनमारुन आमचे सदस्य पळवले. हे सर्व रोहित पवारने केलं. निलेश घायवळ त्यांच्या बरोबर गेला की सामाजिक कार्य आणि आमच्या प्रचारात आला की गुंड. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस हा गुंडच असतो” असं राम शिंदे म्हणाले.
मोक्का मधून सोडवण्यासाठी कोणी मदत केली?
निलेश घायवळ सोबत संबंध असल्यावरुन आरोप होत आहेत, त्यावर राम शिंदे म्हणाले की, “निलेश घायवळ आणि माझ्यात दूरदूरपर्यंत संबंध नाही. मी गृहराज्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्याच्यावर मोक्का लावला. त्यातून सोडवण्यासाठी रोहित पवारांनी मदत केली”
