Prakash Mahajan Resign : मनसेला मोठा धक्का, प्रकाश महाजन यांचा राजीनामा, नाराजीच कारण काय?
Prakash Mahajan Resign : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका बसला आहे. प्रकाश महाजन यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. प्रकाश महाजन हे मनसेचे मोठे नेते होते. स्थापनेपासूनच ते पक्षासोबत होते.

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका बसला आहे. प्रकाश महाजन यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती.आता प्रकाश महाजन यांनी मनसेचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पक्षाच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन हे पक्षात अस्वस्थ असल्याच दिसत होतं.
पक्षाचे काही ठराविक कार्यक्रम आणि मेळाव्यांपासून प्रकाश महाजन यांना लांब ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. मनसेच्या नाशिकच्या मेळाव्याला प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आलं नव्हतं, म्हणून प्रकाश महाजन दुखावले गेले होते. ते पक्षाचे प्रवक्ते होते, तरी त्यांना काही वृत्त वाहिन्यांवर प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना आल्या होत्या. प्रकाश महाजन यांनी पक्ष का सोडला? ते ठोस कारण समोर आलेलं नाही. पण ही सर्व कारण त्यामागे असू शकतात.
..तरी नाराजी दूर झाली नाही
मध्यंतरी राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांची मनधरणी योग्य पद्धतीने झाली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून ते मनसेच्या प्रमुख कार्यक्रमांपासून लांबच होते. प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे धाकटे बंधु आहेत.
मराठवाड्यातील मनसेचा प्रमुख नेता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच ते पक्षामध्ये होते. मराठवाड्यातील मनसेचा प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मनसेचा ते बुलंद आवाज होते. टीव्ही डिबेट शो मध्ये ते मनसेचा मु्द्दा लावून धरायचे. अलीकडच्या काळात त्यांचा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत शाब्दीक वाद रंगला होता. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यात दृढ मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
