BMC Election 2026: राज्यात 29 पालिकांसाठी उद्या मतदान; मतदारांनी काय करावं अन् काय करू नये?
BMC Election 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. यावेळी मतदारांनी काय करावं आणि काय करू नये, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या..

राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला प्रचार अखेर मंगळवारी थंडावला. राज्यातील 29 महानगरपालिकांमधील 2869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून शुक्रवारी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सर्वांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे आहे. जवळपास नऊ वर्षांनंतर होणारी महानगरपालिकांची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. शेवटच्या चार-पाच दिवसांत तर सर्वच महानगरपालिकांमध्ये गल्लीबोळांत कर्णकर्कश प्रचार करण्यात आला. इतकंच नव्हे तर मतांसाठी मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर उघडकीस आले. आता गुरुवारी मतदान होणार असून त्यादिवशी मतदारांनी काय करावं आणि काय करू नये, याबद्दल जाणून घ्या..
काय करावं?
- मतदान केंद्रावर जाताना तुमचं मतदार ओळखपत्र सोबत घेऊन जात.
- मतदाराची माहिती असलेली स्लिप सोबत ठेवा, जर तुमच्याकडे स्लिप नसेल तर ती मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपलब्ध असेल.
- तुम्ही खालीलपैकी कोणतंही वैध ओळखपत्र सोबत घेऊन जाऊ शकता:
- आधार कार्ड
- मनरेगा जॉब कार्ड
- फोटोसह पासबुक
- ड्राइव्हिंग लायसन्स
- राज्य किंवा केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं सेवा ओळखपत्र
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- फोटोसह पेन्शन दस्तऐवज
- एनपीआर अंतर्गत भारताच्या रजिस्ट्रार जनरलने जारी केलेलं स्मार्ट कार्ड
- कामगार मंत्रालयाने जारी केलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
- खासदार, आमदार किंवा एमएलसींना दिलं जाणारं अधिकृत ओळखपत्र
काय करू नये?
- मतदान केंद्रावर मोबाइल फोन घेऊन जाऊ नका. मोबाइल नेलं तर ते बंद (स्विच ऑफ) असल्याची खात्र करा.
- ज्वलनशील वस्तू किंवा धारदार वस्तू जसं की लाइटर, चाकू खिशात बाळगू नका.
- अफवा पसरवू नका किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका.
- उमेदवार कोणत्याही पॅम्प्लेटशिवाय मतदारांना दारो दारी जाऊन भेटू शकतात, पण मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावर अशा कोणत्याही कृतीला परवानगी नाही.
निवडणूक प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याची मुभा आहे. मात्र पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन प्रचार करता येणार नाही. तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि एसएमएसद्वारेसुद्धा प्रचारावर बंदी आहे. सर्व महापालिका आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत.
