
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपने शानदार कामगिरी केली आहे. बहुतांशी महापालिकांवर भाजपचे वर्चस्व पहायला मिळत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या या विजयावर आणि मुंबईतील ठाकरे बंधुंच्या पराभवावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भाजपच्या विजयाबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, ‘डबल इंजिन सरकार म्हणजे मोदीजींचं सरकार, देवेंद्रजींचे सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, विकसित महाराष्ट्र बनवू शकतं, ग्रामीण भागातूनही असाच निकाल मागच्या वेळी आला होता. मला असं वाटतं की हे मत विश्वासाचं मत आहे, विकासाचं मत आहे. सध्या हाती आलेला कल आता असाच सुरू राहील आणि महायुती दोन तृतियांश बहुमताने आणि 51 टक्के नगरसेवकांसह भाजप विजय मिळवले असं मला वाटतं.
मुंबईत ठाकरेंना मतदारांनी का नाकारलं यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘या पराभवाचं एकच कारण आहे. या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाचं व्हिजन,एकनाथ शिंदे आणि भाजपाची महायुती आणि डबल इंजिन सरकारवर सरकारने विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.’ दरम्यान या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. शरद पवारांची राष्ट्रवादीही त्यांच्यासोबत होती. मात्र या आघाडीला आता मुंबईकरांनी नाकारल्याचे समोर आले आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सरशी पहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेने 130 जागांवर आघाडी घेतली आहे. यातील काही उमेदवार विजयी झाले आहेत. तर ठाकरे बंधू हे 71 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेत भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे. तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. कल्याण डोंबिवलीतही भाजप आणि शिवसेना आघाडीवर आहे. तर नाशिकमध्येही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यातील बहुतांशी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकताना दिसणार आहे.