
BMC Election 2026 : मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला असल्याने आता प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. प्रचारसभांमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. महायुतीचे नेते तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार आणि तिखट शब्दांत हल्लांबोल करताना दिसत आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरपूम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली असून महापौरपदावरही महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
संजय निरुपम यांनी रविवारी (4 जानेवारी) मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी मोठा दावा केला आहे. त्यांनी काहीही झालं तरी या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल. तसेच या विजयानंतर मराठी आणि हिंदू व्यक्तीच मुंबई पालिकेच्या महापौरपदावर बसेल, असा ठाम विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. हा विजय मुंबईतला मराठी माणूसच ठरवणार आहे, असेही पुढे निरूपम म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी साधारण 25 वर्षे मुंबईच्या महापालिकेवर सत्ता गाजवली. परंतू मुंबईचा सर्वांगीन विकास होऊ शकला नाही. गेल्या 25 वर्षात मुंबईकरांना स्वच्छ पाणी मिळालेले नाही. सोबतच पुरेसे पाणीदेखील उपलब्ध झालेले नाही. मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती खूपच खराब आहे. रुग्णालयांचे व्यवस्थापनही व्यवस्थित केले जात नाहीये. शाळांची स्थिती बिकट आहे, असे अनेक आरोप निरुपम यांनी केले.
मुंबई आजही मूलभूत सोई-सुविधांसाठी झगडते आहे. गेल्या 25 वर्षांत ठाकरे यांना विकास करता आला नाही. आता ते मतदारांना पोकळ आश्वासनं देत आहेत, असाही हल्लाबोल त्यांनी केला.
दरम्यान, महायुती हिंदुत्त्व आणि विकासाच्या मुद्द्याला पुढे करून निवडणूक लढवत आहे. तर ठाकरे बंधूंनी मराठी माणूस हा मुद्दा लावून धरला असून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे इथे नेमकं कोण विजयी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.