Maharashtra Election News LIVE : मंत्री पुत्र विकास गोगावले अखेरीस महाड शहर पोलीसांसमोर शरण

BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: आज बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे केडीएमसीमधील शिंदेसेना-मनसे युतीवर संजय राऊत यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

Maharashtra Election News LIVE : मंत्री पुत्र विकास गोगावले अखेरीस महाड शहर पोलीसांसमोर शरण
| Edited By: | Updated on: Jan 23, 2026 | 11:03 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Jan 2026 11:03 AM (IST)

    मंत्री पुत्र विकास गोगावले अखेरीस शरण, महाड शहर पोलीस ठाण्यात लावली हजेरी

    महाड नगरपालिका निवडणूक राड्या प्रकरणातील आरोपी मंत्री पुत्र विकास गोगावले यांनी अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठरलेल्या वेळेतच विकास गोगावले पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यांच्या शरणागतीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष केंद्रित झालं आहे.

  • 23 Jan 2026 10:57 AM (IST)

    वसई-विरारच्या महापौर निवडीचा मुहूर्त ठरला, या 6 नावांची जोरदार चर्चा

    वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची प्रतीक्षा आता संपली असून, येत्या ३० किंवा ३१ जानेवारीला नवीन महापौरांची निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे नेहमीच सर्व जाती-धर्मांना न्याय देण्यासाठी ‘सोशल इंजिनिअरिंग’चा वापर करतात, त्यामुळे यंदा ठाकूर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. सध्या या पदासाठी सहा नावे चर्चेत आहे. त्यामध्ये माजी स्थायी समिती सभापती आजीव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. आजीव पाटील हे पक्षाचे संघटक सचिव व प्रवक्ते असून रणनीती ठरवण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यांच्यासह माजी महापौर प्रवीण शेट्टी, कन्हैया भोईर, ख्रिश्चन समाजाचे नेते प्रकाश रॉड्रीग्ज, तसेच मुस्लिम समाजातून आलमगीर डायर आणि आफिफ जमील शेख यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील निकाल आणि भाजपचे वाढते आव्हान पाहता, महापालिकेत अनुभवी चेहरा देण्यावर ठाकूरांचा भर असण्याची शक्यता आहे.

  • 23 Jan 2026 10:47 AM (IST)

    बीडच्या नाथापूरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, जुन्या वादातून दगडफेक

    बीड जिल्ह्यातील नाथापूर येथे रात्री उशिरा जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. या दोन्ही गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर तुफान हाणामारी व दगडफेकीत झाले. या हिंसक घटनेत दोन्ही बाजूंचे अनेक लोक गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हाणामारीचे काही व्हिडीओ समोर आले असून त्यात दोन्ही गट एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 23 Jan 2026 10:37 AM (IST)

    बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष, स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची गर्दी

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून मोठ्या उत्साहात आणि तितक्याच भावुक वातावरणात सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक दिनानिमित्त मुंबईतील शिवतीर्थावरील त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल होत आहेत. यावेळी बाळासाहेबांच्या आठवणीने अनेक जुन्या शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मुंबईतील सत्ता हातातून गेल्याबद्दल शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “आज बाळासाहेब असते तर मुंबईचा निकाल काही वेगळाच लागला असता, त्यांनी मुंबई कधीच हातातून जाऊ दिली नसती. ज्यांच्यामुळे आज मुंबईवरचे शिवसेनेचे वर्चस्व कमी झाले, त्यांना निसर्ग कधीच माफ करणार नाही,” अशी संतप्त आणि भावुक प्रतिक्रिया स्मृतीस्थळावर आलेल्या शिवसैनिकांनी दिली आहे.

  • 23 Jan 2026 10:27 AM (IST)

    बदलापूर अत्याचार प्रकरणातील ती व्हॅन अवैध, RTO कडून 24 हजारांचा दंड

    बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये आता प्रशासकीय पातळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ज्या खाजगी व्हॅनमध्ये हे संतापजनक कृत्य घडले, ती व्हॅन आरटीओच्या (RTO) कोणत्याही परवानगीशिवाय अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत आरटीओ विभागाने संबंधित व्हॅनवर २४,००० रुपयांचा दंड ठोठावला असून त्या व्हॅनचा परवाना कायमचा रद्द केला आहे. या कारवाईमुळे अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या घटनेमुळे बदलापूर परिसरात पुन्हा एकदा संतापाची लाट असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

  • 23 Jan 2026 10:17 AM (IST)

    नाशिक महापालिकेत मनसेची ताकद घटली, स्वतंत्र गट स्थापन करणार

    नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आज आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहे. या निवडणुकीत मनसेची ताकद घटली असली तरी, प्रभाग क्रमांक १३ मधून मयुरी पवार या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. महापालिकेच्या नियमानुसार, एकाच नगरसेवकाचाही स्वतंत्र गट स्थापन करता येतो. त्यानुसाार मयुरी पवार यांची गट नेते म्हणून निवड निश्चित मानली जात आहे. मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी ही माहिती दिली असून, गट स्थापनेनंतर महापालिकेत नेमकी कोणासोबत युती करायची किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेणार आहेत.

  • 23 Jan 2026 10:07 AM (IST)

    निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्या; माजी मंत्री के.सी. पाडवींची आक्रमक मागणी

    नंदूरबारमध्ये पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी राज्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची आग्रही मागणी केली. कर्नाटकने स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली असून, बॅलेट पेपर नसल्यास निवडणुकीत केवळ पैसेवाले आणि गुंड लोकांचाच प्रभाव वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही पाडवी यांनी यावेळी केला.

  • 23 Jan 2026 09:50 AM (IST)

    जळगावच्या आव्हाणे गावात किरकोळ वादातून मारहाणीत तरुणाचा मृत्यू

    सागर अरुण बिऱ्हाडे, असे मयत तरुणाचे नाव. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एलसीबीच्या पथकाने नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेत तपासचक्र फिरवली

  • 23 Jan 2026 09:40 AM (IST)

    नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली काळ्या घोड्यांच्या छळाचा प्रकार उघड

    दोन काळे घोडे घेऊन काही संशयित शहरात फिरत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी. जागेवरच नाल तयार करून घोड्यांच्या पायात ठोकल्याचा प्रकार. अंधश्रद्धाळू नागरिकांकडून नाल कोणत्याही किमतीत केली जात होती खरेदी. गेल्या चार दिवसांपासून नाशिकच्या मंगलरूप गोशाळा टीमकडून सुरू होता संशयितांचा शोध. अखेर नाशिकच्या एबीपी सर्कल परिसरात संबंधित व्यक्ती सापडल्या. मंगलरूप गोशाळा टीमकडून संबंधितांचा समाचार, समज व कायदेशीर कारवाई

  • 23 Jan 2026 09:30 AM (IST)

    शिवसेनेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांचे बंधू रवी पाटील यांना दिलासा नाहीच..

    डोंबिवली भाजप कार्यकर्त्यावर खुनाचा प्रयत्न प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक नितीन पाटील व त्यांचे बंधू रवी पाटील यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला,.तर इतर चार आरोपींना जामीन मंजूर. डोंबिवलीतील सुनीलनगर–तुकारामनगर परिसरात निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाणी प्रकरणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय भाजप नगरसेविका आर्या नाटेकर यांच्या पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर धारदार शस्त्र व काठ्यांनी हल्ल्याचा आरोप

  • 23 Jan 2026 09:20 AM (IST)

    विद्यार्थिनीने अजित दादांना लिहिलेल्या पत्रानंतर त्रिसदस्यीय समिती करणार चौकशी

    बीडच्या परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी अंकिता अवचट हिने उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेत कुठलीच व्यवस्था नसल्याचे म्हटले होते. तर सरपंचांनी सोयी सुविधांच्या नावाखाली पैसे उचलले मात्र प्रत्यक्षात कुठलीच सुविधा नसल्याचाही आरोप केला होता.

  • 23 Jan 2026 09:05 AM (IST)

    नारायण कुचेंची कॉल रेकॉर्डिंग खरी, मोठा दावा…

    महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस संरक्षणात पैसे वाटल्याची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. ती कॉल रेकॉर्डिंग खरी आहे असे म्हणत प्रभाग क्रमांक 24, 25 आणि संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले आणि त्याचे हे पुरावे आहेत, असा दावा करत पैसे वाटपाचा एक व्हिडिओ दाखवुन ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या दिपक केदार यांनी आमदार नारायण कुचे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • 23 Jan 2026 09:00 AM (IST)

    धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 165 जागेसाठी 2259 उमेदवार

    धाराशिव जिल्ह्यात 165 जागेसाठी 2259 उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात आहेत.यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 938 तर पंचायत समिती साठी 1321 उमेदवाराने उमेदवारी दाखल केली आहे. दाखल झालेल्या 2327 अर्जापैकी 38 अर्ज छाननी अंती झाले बाद तर तीन अर्जावरती आक्षेप घेण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात 55 जागा जिल्हा परिषदेसाठी तर पंचायत समितीच्या 110 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे

  • 23 Jan 2026 08:55 AM (IST)

    बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त बॅनरबाजी

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त मातोश्री परिसरात सध्या जोरदार बॅनरबाजी दिसून येत आहे. दोन्ही शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असल्याचा दावा करण्यात येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न देण्याची मागणी केलीये…

  • 23 Jan 2026 08:45 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील 16 ऑक्सिजन प्लांट बंद

    अमरावती जिल्ह्यातील 16 ऑक्सिजन प्लांट बंद झाले आहेत. सिलेंडर खरेदीवर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला आहे. कोरोना काळात हे ऑक्सिजन प्लांट उभारले होते. दिवसाला 13,36 मॅट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे. ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यासाठी टेक्निशन आणि मनुष्यबळ न मिळाल्याने प्लांट शोभेची वस्तू बनले आहेत.पाच वर्षापासून एकही ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला नाही.

  • 23 Jan 2026 08:40 AM (IST)

    शेतमाल निर्यातीच्या नावाखाली शेतकऱ्यांना १५ कोटींचा गंडा

    मानद व्यापार आयुक्त अशी बेकायदेशीर पदवी धारण करून फसवणूक करणाऱ्याला पुण्यात अटक करण्यात आली. या घटनेची व्याप्ती राज्यभर असल्याचा पोलिसांना संशय आहे. शेतमालाच्या निर्यात व्यवसायात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत अनिल गवळी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

     

  • 23 Jan 2026 08:30 AM (IST)

    जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसणार घराणेशाही

    राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या घराणेशाहीला मतदार थारा देणार का, याबाबत उत्सुकता आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिल्यांदाच चिरंजीव श्रीराज भरणे यांना निवडणुकीत उतरवले आहे. इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समितीच्या निवडणुकीतून श्रीराज राजकारणातील नशीब आजमावून पाहणार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या बावडा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

  • 23 Jan 2026 08:20 AM (IST)

    भाजपकडून दोन उमेदवारांना AB फॉर्म

    सोलापुरातील दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये भाजपकडून दोन उमेदवारांना AB फॉर्म दिल्याने काही काळ पेच निर्माण झाला.मंद्रूप पंचायत समिती गणातील भाजपच्या दोन्ही इच्छुक उमेदवारांना AB फॉर्म दिल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता . भाजपचे इच्छुक उमेदवार मळसिद्ध मुगळे आणि रेवणसिद्ध मेंडगुदले या दोघांत संभ्रम निर्माण झाला.दोन्ही उमेदवारांपैकी कोणाचा AB फॉर्म वैध हे ठरवण्यासाठी सुनावणी घेण्यात आली.यामध्ये मळसिद्ध मुगळे यांचा अर्ज अखेर वैध ठरवण्यात आला

  • 23 Jan 2026 08:12 AM (IST)

    या भीतीने प्रमुख नगरसेवकांना पाडले-वसंत मोरे

    २०२२ ते २०२६ या कालावधीमधे राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल.या भीतीने पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले.या भीतीने प्रमुख नगरसेवकांना पाडण्यात आले, शिवसेना उबाठा चे वसंत मोरे यांनी भूमिका मांडली.पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले, वसंत मोरे यांनी अशी तक्रार केली.

  • 23 Jan 2026 08:06 AM (IST)

    नाशिक महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा

    नाशिक महापौर पदावर खुल्या प्रवर्गातील महिला विराजमान होणार आहे. 26 वर्षानी नाशिकचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे.महापौर पदाच्या खुर्चीसाठी 16 महिलांची नावं चर्चेत आहेत. हिमगौरी आडके, संध्या कुलकर्णी,डॉक्टर दिपाली कुलकर्णी, दीपाली गीते,यांच्यामध्ये विशेष स्पर्धा दिसून येत आहे.उच्च शिक्षित आणि चांगला उमेदवार महापौर साठी देऊ गिरीश महाजन यांचे देखील सूचक वक्तव्य केले आहे.नाशिक महापालिकेत भाजपाला मिळाली एक हाती सत्ता आहे.

आज बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती आहे. तर दुसरीकडे महापौर पदाची सोडत निघाल्यानंतर मुंबईचा महापौर कोण होणार याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे-शिंदे युतीवरुन खटके उडाले आहेत. संजय राऊत यांनी याप्रकारावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. तर पालिका निकालानंतर आज ठाकरे बंधु आज पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. तर राज्यातील विविध महापालिकेत दावेदारांनी फिल्डिंग लावली आहे. महापौर पदाचे आरक्षण सोडत निघाल्यानंतर काही ठिकाणी दावेदारांची संख्या वाढली आहे. अकोल्यासह चंद्रपूर आणि इतर ठिकाणी बिगर भाजप महापौर बसवण्यासाठी अनेक पक्षांनी एकत्र येण्याचा राज्यात प्रयोग होत आहे.