कबुतरांना दाणे टाकत असाल तर सावधान, आता थेट गुन्हा दाखल होणार
मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास बंदी घातली आहे. कबुतरांमळे लोकांना त्रास होतो, तसेच सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो असं न्यायालयाने म्हटले आहे.

मंबईसह अनेक शहरांमध्ये लोक कबुतरांना खायला दाणे टाकत असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मात्र आता अशा लोकांवर कारवाई होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास बंदी घातली आहे. कबुतरांमळे लोकांना त्रास होतो, तसेच सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो असं न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
उच्च न्यायालयाने शहरात असलेले कबुतरखाने हटवण्यास बंदी घातली होती, मात्र त्यांना खाद्य टाकण्याची परवानगी दिली नव्हती. आताही ही परवानगी देण्यात आलेली नाही, तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाने महापालिकेला आदेश देताना म्हटले की, ‘कबुतरांना खाद्य टाकल्याने सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास होतो. यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. अनेकांना कबुतरांमुळे गंभीर आजार होतात, त्यामुळे आता न्यायालयाने महानगरपालिकेला कबुतरांच्या प्रेमापोटी त्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?
प्राणीप्रेमींच्या गटाने याबाबत याचिका दाखल केली होती. यावर न्यायाधीश जी.एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे. यामुळे सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्याला गंभीर आणि संभाव्य धोका निर्माण होत आहे.’
दरम्यान, जुलैच्या सुरुवातीला न्यायालयाने शहरातील जुने कबुतरखाने हटवण्यापासून थांबवले होते. मात्र कबुतरांना खायला घालण्यास परवानगी दिली नव्हती. त्यानंतर आता कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. यामुळे कबुतरांना खाद्य पुरविणे बंद होईल आणि लोकांच्या आरोग्याला असणारा धोका कमी होईल अशी आशा न्यायालयाला आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार
न्यायालयाने यावेळी म्हटले की, परवानगी नसतानाही अनेक लोक कबुतरांना खाद्य टाकत आहेत. मात्र आता नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषींवर दंडात्नक कारवाई होण्याची शक्यता आहे.
