माझे वडील सुद्धा शेती करायचे… बेताल वक्तव्यानंतर सरावासारव, संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण
Sanjay Gaikwad Controversy Statement: आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मयताला सुद्धा जाऊ नका, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सारवासारव केली आहे. वाद उफाळल्यानंतर शिवसेनेतूनही त्यांच्यावर नाराजी वाढली. त्यानंतर त्यांनी वक्तव्यावरून युटर्न घेतला.

Sanjay Gaikwad Controversy Statement: “शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास त्याच्या मयताला, अंत्यसंस्काराला कोणीही जाऊ नये. त्यांची बॉडी जनावरं खातील, तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि ते आत्महत्या करणार नाही.” असे असंवेदनशील वक्तव्य बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. संजय गायकवाड हे बेताल वक्तव्याने गेल्या काही दिवसात सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात पडले. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नाराज झाल्याचे आणि गायकवाडांविरोधात कारवाईचे संकेत समोर आले. त्यानंतर गायकवाड यांनी वक्तव्यावरून युटर्न घेतला. पण त्यांची सारवासारव समोर आली.
शेतकर्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मग दिलगिरी व्यक्त
“मी संपूर्णपणे शेतकरी कुटुंबातील असून माझे वडीलही हे शेती करायचे त्यामुळे मी शेतकऱ्यांचे संबंधित कधीही वाईट बोलू शकत नाही माझं विधान हे जे लोक अमली पदार्थ घेऊन आपला संसार उघड्यावर टाकतात व आत्महत्या करतात त्यांच्याविषयी मी बोललो होतो या विधानाचा विपर्यास केला व त्यावर वाद निर्माण झाला. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” अशी सारवासारव संजय गायकवाड यांनी केली.
निलंबनाच्या प्रस्तावाबाबत नो कमेंट्स
विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आहे महायुतीत धुसफुस वगैरे काही नाही. छोट्या मोठ्या गोष्टी सुरूच असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेच्या सध्याच्या शाब्दिक चकमकींवर दिले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं निलंबन करण्याचा प्रस्ताव व तसे आदेश दिले आहेत यावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड फक्त नो कमेंट्स म्हटले.
त्यांची जीभ छाटली पाहिजे
काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या शेतकऱ्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. आज माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला आमदार म्हणून राहण्याचा काहीही अधिकार नाही. ज्या पक्षात ते काम करत आहेत, त्या पक्षातून त्यांचे निलंबन केले पाहिजे. पुढील कारवाई सरकारने केली पाहिजे. सरकारने डिसेंबरच्या अधिवेशनात प्रस्ताव आणून त्यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तर ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही ते अनेकदा खालच्या भाषेत बोलले आहेत. त्यांच्या शब्दांना मर्यादा नाही. अशांची जीभ छाटली पाहिजे, असे जहाल वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले.