Sanjay Gaikwad: महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्य, संजय गायकवाड यांना नागपूर खंडपीठाचा मोठा दिलासा, आदेश काय?
Sanjay Gaikwad Nagpur High Court: नेहमी वेगवेगळ्या वादामुळे चर्चेत राहणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला. महिलांवरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हायकोर्टात त्यांना अंतरिम दिलासा मिळाला.

गणेश सोळंकी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मोठा दिलासा मिळाला. नागपूर खंडपीठाने त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली आहे. बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना महिलांवरील कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अंतरिम दिलासा मिळाला आहे न्यायालयाने कायदेशीर बाबी विचारात घेता गायकवाड यांच्याविरुद्ध पुढील आदेशापर्यंत दोषारोप पत्र दाखल करण्यास मनाई केली आहे.
तो युक्तीवाद ठरला महत्त्वाचा
बुलढाणा शहर पोलिसांनी 12 सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या सविता बेंडवाल यांच्या तक्रारीवरून गायकवाड यांच्या विरोधात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. आमदार गायकवाड यांनी स्त्री जातीच्या शारीरिक ठेवणीवर आणि क्षमतेवर बेजबाबदार आणि अवमानकारक भाष्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रार सहा दिवस विलंबाने करण्यात आली असून त्यामागे तक्रारकर्तीचा राजकीय हेतू लपलेला आहे, तसाच तक्रारकर्तीचा घटनेची कोणताही थेट संबंध नाही असे गायकवाड यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने गायकवाड यांना अंतरिम दिलासा देऊन राज्य सरकारला येत्या 21 ऑक्टोबर पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.
प्रकरण तरी काय?
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी वादामुळे चर्चेत असतात. मंत्रालयातील कॅन्टिनमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण असो वा शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या लेखकाशी वाद असो ते कायम चर्चेत आहे. सध्या चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि आमदार गायकवाड यांच्यात विस्तवही जात नसल्याचे समोर आले आहे. दोघांकडूनही जिल्ह्यात शक्ती प्रदर्शन सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हा वाद इतका टोकाला गेला की त्यात कार्यकर्तेही भरडले जात आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला 1 सप्टेंबर रोजी आमदार श्वेता महाले या बाप तो बाप रहेगा या गाण्यावर थिरकल्या होत्या. आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना त्यावरून एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. “बाप तो बाप रहेगा हे माणसानं बोललेलं बरं पण एखाद्या बाईनं म्हटलं की बाप आहे तर बाई बापासारखं शरीर कुठून आणणार.” असं वक्तव्य आणि त्यांनी केलेले हावभाव यावरून तक्रार दाखल करण्यात आली होती. महिलांच्या मनाला लज्जा वाटेल अशी त्यांची कृती असल्याचे तक्रारीत म्हटले होते. तर तक्रारीनंतर बुलढाणा पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला होता. तर नागपूर खंडपीठात याविरोधात संजय गायकवाड यांनी धाव घेतली होती.
