किसान सभेचा ‘चलो दिल्ली’चा नारा, नाशिक ते दिल्ली 1266 किमीचा प्रवास करुन हजारो शेतकरी दिल्लीला धडक

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो शेतकरी थेट दिल्लीत जाऊन सामील होणार आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:57 AM, 19 Dec 2020
किसान सभेचा 'चलो दिल्ली'चा नारा, नाशिक ते दिल्ली 1266 किमीचा प्रवास करुन हजारो शेतकरी दिल्लीला धडक

नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो शेतकरी थेट दिल्लीत जाऊन सामील होणार आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली 21 डिसेंबर 2020 रोजी नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्राचे हजारो शेतकरी दिल्लीच्या रणसंग्रामात सामील होण्यासाठी निघतील. शेकडो वाहनांमधून हजारो शेतकरी 1266 किलोमीटरचा प्रवास करून 24 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील. दिल्लीला विविध राज्यांना जोडणारे प्रमुख महामार्ग शेतकऱ्यांनी अगोदरच ब्लॉक केले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी राजस्थान हरियाणा सीमेवर शहाजहानपूर येथे दिल्लीकडे जाणारा महामार्ग रोखत आंदोलनात सामील होतील (Chalo Delhi March by Kisan Sabha to Support Farmer Protest against Farm Laws).

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक आणि निवासाची व्यवस्था सोबत घेऊन निघाले आहेत. ते बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जातील. किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य सहसचिव सुनील मालुसरे आणि सीटूचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली.

‘वाहन जत्था काढून मात करत हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य’

दिल्ली येथील आंदोलनात दिल्लीच्या आजूबाजूची राज्ये प्रामुख्याने सामील झाली आहेत. 3 डिसेंबरच्या देशव्यापी निदर्शनांमध्ये आणि 8 डिसेंबरच्या भारत बंदमध्ये देशभरातील इतर राज्यांमधील जनतेने आंदोलनाला प्रचंड पाठिंबा दिला असला, तरी दिल्लीपासून दूर असलेल्या राज्यांमधील शेतकरी अद्याप प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊ शकले नव्हते. रेल्वेची सामान्य वाहतूक बंद असल्याने इच्छा असूनही शेतकरी दिल्लीला जाऊ शकले नव्हते. आता दिल्लीपासून दूर असूनही वाहतुकीच्या या अडचणीवर वाहन जत्था काढून मात करत हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या या लढाऊ कृतीनंतर इतर राज्यातील शेतकरीही वाहन जथ्थे काढत दिल्लीच्या दिशेने कूच करतील, असा विश्वास किसान सभेने व्यक्त केलाय.

चलो दिल्लीचं नियोजन कसं?

महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधील शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जमतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी 1 वाजता दिल्लीच्या दिशेने निघतील. मोदी सरकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणत असल्याने ही लढाई केंद्र सरकार आणि त्यांचे कॉर्पोरेट भागीदार यांच्याविरोधात असल्याने वाहन जत्था दिल्लीला प्रस्थान करण्यापूर्वी नाशिक येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने करण्यात येतील, अशीही माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांचा वाहन जत्था कोणत्या मार्गे दिल्लीला जाणार?

महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनांचा या चलो दिल्ली मोहिमेला पाठिंबा असणार आहे. 22 डिसेंबर रोजी दुपारी वाहन जत्था धुळे येथे पोहचल्यावर राज्यभरातील सर्व समविचारी शेतकरी, कामगार व श्रमिक संघटनांच्या वतीने धुळे येथे पाठिंबा सभा घेण्यात येईल. जनआंदोलनांच्या संघर्ष समितीतील विविध संघटना 22 डिसेंबरला दुपारी 3 वाजता धुळे येथे होणाऱ्या मोठ्या जाहीर सभेत दिल्लीत जाणाऱ्या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा व्यक्त करतील. तसेच ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे, मालेगाव आणि शिरपूर येथेही जनतेच्या वतीने जथ्याचे जंगी स्वागत केले जाईल.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीजबिल विधेयक मागे घ्यावे व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधार भावाचे संरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा अशी मागणी किसान सभा करत आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला आणखी व्यापक करत तीव्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या ऐतिहासिक चलो दिल्ली आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन किसान सभेनं केलं आहे.

हेही वाचा :

Farmer Strike | आंदोलनाच्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी सुरु केली कांदा-टोमॅटोची शेती

यूपीए सरकारनं केलेल्या पापाचं प्रायश्चित म्हणजे नवे कृषी कायदे- नरेंद्र मोदी

Farmer Protest | शेतकरी आंदोलन थांबवण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ‘या’ मुद्द्यावर सर्वाधिक जोर

Chalo Delhi March by Kisan Sabha to Support Farmer Protest against Farm Laws