
उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर जबाबदारी आहे. दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी नातेवाईकसुद्धा प्रयत्न करत आहे. याबाबत अनिल परब यांच्यावर जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया मराठवाड्यातील उद्धव ठाकरे गटाचे मोठे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. परंतु यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी दिलेला सल्ला उडवून लावला आहे. “एकनाथ शिंदे छे….ते कशाला पाहिजेत? त्यांनी उद्धव, आदित्य ठाकरे यांना त्रास दिला आहे. आम्हाला एकनिष्ठ असलेली व्यक्ती पाहिजे. गजानन कीर्तीकर हे तसं बोलले असतील कारण त्यांचा मुलगा आमच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना शिंदेंसोबत जाऊन पश्चात्ताप होतोय,” असं ते पुढे म्हणाले.
“राज आणि उद्धव ठाकरे यांची युती होत असेल तर या युतीत एकनाथ शिंदे हवेत. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्व पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्याकडे शिवसेना नाव आणि चिन्ह आहे. त्यामुळे शिंदेंनाही या युतीत घेतलं पाहिजे. त्यासाठी मी स्वत: प्रयत्न करेन. बाळासाहेबांची जशी एकसंघ शिवसेना होती. तशीच एक संघ शिवसेना पुन्हा निर्माण व्हायला पाहिजे”, असं गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं होतं.
“उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर ते दोघं मिळून महायुतीला धडा शिकवतील. दोन्ही बंधू एकत्र येतील म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळेसुद्धा एकत्र येण्याच्या उकळ्या फुटत आहेत. एकनाथ शिंदे गटाची परिस्थिती काही दिवसांत वाईट होईल. शिवसेना फोडली याचं गजाभाऊंनादेखील वाईट वाटतंय”, असा टोला खैरेंनी लगावला आहे. यावेळी त्यांनी राणे कुटुंबीयांवरही जोरदार टीका केली. “नारायण राणे यांच्या पुत्रांनी भाजप संपवण्याचा घाट केला आहे. त्यांना शिस्त नाही. त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको. ते घाणेरडं बोलत आहेत. थांबा, तुम्हालाच आम्ही जेलमध्ये टाकणार आहोत. यांची खूप प्रकरणं आहेत, हेच जेलमध्ये जाणार आहेत. राणे परिवार भाजपाला संपवण्याचा घाट घालत आहे. त्यांना शिस्त नाही. राणे परिवाराला आम्ही तुरुंगात टाकू. त्यांचे अनेक मोठे कारनामे आम्हाला माहीत आहेत”, असं ते म्हणाले.