सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फक्त फडणवीसांचाच शब्द…
देवेंद्र फडणवीस हेच भाजपचा आधार असून त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा मोठा विजय होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्ष हा दीड कोटी सदस्यांचा परिवार असून देवेंद्र फडणवीस हे या परिवाराचा एकमेव आधार स्तंभ आहेत. काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीचे प्रतिबिंब भाजपमध्ये शोधण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, मात्र आमचा पक्ष फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे एकसंघ आहे असे विधान भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजयाचा हुंकार भरला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौरांसह आमचे सर्व उमेदवार दोन तृतीयांश बहुमताने विजयी होतील, असा विश्वास मला आहे. विकासाच्या मुद्द्यावर जनता महायुतीलाच कौल देणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पावती या निकालातून दिसेल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
केवळ भावनिक राजकारण करून जनतेची दिशाभूल
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित मुलाखतीवर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोचक टीका केली. या मुलाखतीमध्ये काहीही नावीन्य नाही. एकाने लिहून द्यायचे आणि दुसऱ्याने ते बोलायचे, असा हा प्रकार आहे. या मुलाखतीची उत्सुकता आता जनतेमध्ये उरलेली नाही आणि कोणीही याला गांभीर्याने घेत नाही, असे ते म्हणाले. आता विरोधक केवळ भावनिक राजकारण करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला.
भाजपमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकताना बावनकुळे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मनात देवेंद्रजींबद्दल कोणतीही नाराजी नाही. काही स्थानिक प्रश्न असू शकतात, पण भाजपमध्ये गटतटाचे राजकारण चालत नाही. पक्षात देवेंद्र फडणवीस यांचा शब्द हा अंतिम असतो आणि संपूर्ण पक्ष त्या आदेशाचे पालन करतो.
हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण
जास्तीत जास्त निवडणुका बिनविरोध होणे हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण आहे. स्थानिक पातळीवर नेतृत्वावर विश्वास ठेवून जर विकासासाठी लोक एकत्र येत असतील, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
राज्याच्या विकासाचा रोडमॅप केवळ महायुतीकडेच असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जमिनीवरचा विकास कळतो, म्हणूनच त्यांचा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे. लोकशाहीत प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, परंतु विरोधक केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी भावनिक राजकारण करत आहेत. शेवटी, विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस हे समीकरण आता जनतेच्या मनात पक्के झाले असून, याच विकासाच्या जोरावर भाजप आणि महायुती ऐतिहासिक विजय नोंदवेल, असा ठाम विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
