महापौरपदाच्या निवडणुकीआधी काँग्रेसला बसणार झटका, किती नगरसेवक फुटणार? भाजपच्या बड्या नेत्याचे स्पष्ट संकेत
"शिवसेना उबाठाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही. वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसेल" भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेच्या महापौर पदाच्या मागणीवर स्पष्ट भूमिका.

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दोन दिवस होत नाहीत, तोच फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूरमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे चंद्रपूरपासूनच फोडाफोडीचं राजकारण सुरु होऊ शकतं. चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात आहे, असा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील आम्हीच विकास करू शकतो असं वाटत असल्यामुळे ते आमच्या संपर्कात आहेत असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मात्र भाजप सोबत जाण्यास तयार असलेला गट मोठा असावा यासाठी संपर्कात असलेले काँग्रेस नगरसेवक वाट पाहत असल्याची आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची मुनगंटीवार यांची माहिती.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकून देखील काँग्रेस मधील विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या अंतर्गत संघर्षाचा फायदा भाजप उचलणार का? याबाबत प्रश्न विचारला जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसने चांगलं प्रदर्शन केलं. पण स्वबळावर बहुमत मिळवण्याइतक्या जागा काँग्रेस आणि भाजप जिंकू शकले नाहीत. चंद्रपूरमध्ये आज काँग्रेसकडे 27 आणि भाजपकडे 24 नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजप दोघांना इतर पक्षांची मदत लागणार आहे. उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आलेत. याशिवाय 2 अपक्ष, वंचित बहुजन आघाडीचे 2, बहुजन समाज पार्टीचा 1 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक निवडून आला आहे.
महापौर भाजपचाच
“शिवसेना उबाठाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही. वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसेल” भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेच्या महापौर पदाच्या मागणीवर स्पष्ट भूमिका. “तुम्ही जर भाजपचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार असल्याचं अनेक नगरसेवकांनी म्हंटलं आहे. उबाठा सोबत देखील 2 वेळा चर्चा झाली आहे आणि पहिल्या भेटीतच महापौर पद कोणालाही देता येणार नाही हे आम्ही शिवसेनेला स्पष्ट सांगितल्याचं आणि चंद्रपूर शहराच्या विकासासाठी महापौर भाजपचाच करावा लागेल” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
