Nashik weather: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतरच; दक्षिण महाराष्ट्रात मात्र ऐन दिवाळीत धारानृत्य!

येणाऱ्या काळात पावसाप्रमाणेच थंडीचा सुद्धा कहर होऊ शकतो. हे सारे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमी करत आहेत.

Nashik weather: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतरच; दक्षिण महाराष्ट्रात मात्र ऐन दिवाळीत धारानृत्य!
उत्तर महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नाशिकः राज्यात पुन्हा एकदा हवामान बदल जाणवत असून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता आहे, तर दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केला.

खरे तर दोन दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला होता. 30 ऑक्टोबर रोजी नाशिकचे तापमान 12.8 पर्यंत खाली आले, तर जळगावमध्ये राज्यात सर्वात नीचांकी 12 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली. त्यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजीही नाशिकमध्ये राज्यात नीचांकी अशा 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऐन दिवाळी थंडी वाढणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अनेकांनी वर्षभरापासून बांधून ठेवलेले स्वेटर, कानटोप्या, जॅकेट बाहेर काढले होते. मात्र, आता अचानक हवामान बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कमीच राहणार आहे. नाशिकसह या भागात 9 नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतात सध्या ऐन दिवाळीत पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली. सध्या बंगालचा उपसागर आणि तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते पश्चिमकडे सरकल्याने पावसाचा अंदाज आहे. या काळात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान बदलाचे परिणाम

नाशिककरांना यंदा सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. एकाच महिन्यात मनमाड, नांदगावसारख्या ठिकाणी दोनदा अतिवृष्टी झाली. शिवाय जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली. गोदावरी नदीला यंदा महिनाभरात चार पूर आले. हे पाहता आता येत्या काळात थंडीही जोरदार पडणार असल्याचा अंदाज आहे. पावसाप्रमाणेच थंडीचा सुद्धा कहर होऊ शकतो. हे सारे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमी करत आहेत.

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता आहे, तकर दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. त्यात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही तुरळक पाऊस होईल.
– श्रीनिवास औंधकर, संचालक, एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, एमजीएम, औरंगाबाद

इतर बातम्याः

सोमय्यांना आधी कळतं अन् नंतर कारवाई होते, देशमुख अटकेवर भुजबळांची प्रतिक्रिया; देशभर असे प्रकार सुरू असल्याचा दावा

NashikGold: भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, सोनं झालंय स्वस्त, धनतेरस पावणार!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI