दंगल घडली तर जबाबदार एकनाथ शिंदेच, मनोज जरांगेंचा इशारा; संभाजी नगरात बसून षडयंत्र…
मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगरमध्ये दंगल घडवून मराठा आरक्षण आंदोलनाला धक्का लावण्याचा गंभीर आरोप केला आहे. सरकार मराठ्यांचे वाकडे करू शकत नाही असे बजावत त्यांनी मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. मराठा प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या प्रयत्नांवरून शिंदेंना जबाबदार धरत, जरांगे पाटलांनी मंत्र्यांचे दिवस भरत आल्याचा इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजी नगरात बसून यांचं दंगल घडवण्याचं षडयंत्र आहे. एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्ये मारामाऱ्या घडवून आणायच्या आहेत. दंगल करायची आहे. या आंदोलनात ते होणार आहे. आणि या सर्व गोष्टीला एकनाथ शिंदेच जबाबदार असणार आहे, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीत मीडियाशी संवाद साधत होते. जरांगे यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तुम्ही सर्व मंत्री एकत्र आले तरी आमच्या मराठ्यांचं वाकडं करू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे पैसा आहे. आमदार आणि मंत्र्यांकडे गुंडांची फौज आहे. तुम्हाला वाटत असेल आमदार आणि मंत्री एक होऊन याला दाखवू. पण तुम्ही आमचं वाकडंच करू शकत नाही, असा हल्लाच मनोज जरांगे पाटील यांनी चढवला आहे.
तुम्ही हरला आहात
मनोज जरांगे पाटील हे आजूबाजूच्या लोकांचं ऐकून वागत असल्याचा आरोप राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला होता. त्यावरही त्यांनी पलटवार केला. तुमच्या आजूबाजूला कोण, आमच्या आजूबाजूला कोण हे आरोप आधीही झाले आहेत. आतापर्यंत आम्ही चांगले होतो का? प्रसाद लाड आणि उदय सामंत यांना आतापर्यंत सर्व चांगले वाटत होते का? आमच्यासोबत चहा पिताना चांगलं वाटत होतं का? मराठ्यांना संपवायचं, ही तुमची भूमिका आहे. संभाजीनगरला येऊन तुम्ही षडयंत्र करत आहात. तुम्हाला आमचं आंदोलन मोडीत काढायचं आहे. तुम्ही हरला आहात. तुम्ही नाकर्तेपणा करत आहात. तुम्ही राजकीय स्टटं करत आहात. फडणवीसांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही हे तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही सपशेल हरला आहात, असं जरांगे म्हणाले.
तुमचे दिवस भरत आले
राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही जरांगेंवर टीका केली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे ज्या पद्धतीने बोलत आहेत. ते रुचलं नाही, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं होतं. त्यावरूनही त्यांनी देसाई यांना घेरलं. तुम्हाला रुचलं नसेल. मराठा समाजाला रुचलं आहे. तुमच्या अंगाला लागलेल्या वळाची किंमत आम्हाला होती. एकनाथ शिंदेंना नव्हती आणि कुणालाही नव्हती. तुम्ही मराठ्यांचा वाटोळं केलं आहे. एकनाथ शिंदेंवर टीका करायची नाही म्हणता, मग शिरसाटांकडून शिंदेंनी मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द करून घेतली, तेव्हा कुठे गेला होता तुम्ही? आता जास्त दिवस चालणरा नाही. तुमचे दिवस भरत आले आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.
भाषा बदलणार नाही
मी माझी भाषा बदलणार नाही. आमच्या लेकीबाळीचे प्रमाणपत्र का रद्द करत आहात? एकनाथ शिंदेंना म्हणा असं करू नका. नाही तर लवकरच संपाल. आमच्या नादाला लागू नका. तुमच्या हातून वेळ गेलेली नाही. पटकन संपाल, असंही ते म्हणाले.
