अशी ही सामाजिक बांधिलकी : कोरोनामुळे मायेचे छत्र हरवलेल्या मुलांना मदतीचा हात
कोरोनाच्या महामारीत अनेक कुटूंब हे उध्वस्त झाली आहेत. अनेकांनी आई-वडिलांना गमावलेले आहे. त्यामुळे शिक्षण तर सोडाच पण मुलभूत गरजा पूर्ण करणेही अवघड झाले आहे. याच परस्थितीचे भान राखत एका अवलियाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या वर्षश्राध्द दिवशीच अनाथ बालकांना शिक्षणासाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांचे राष्ट्रीय बचतीचे प्रमाणपत्र देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.

अहमदनगर : कोरोनाच्या महामारीत अनेक कुटूंब हे उध्वस्त झाली आहेत. अनेकांनी आई-वडिलांना गमावलेले आहे. त्यामुळे शिक्षण तर सोडाच पण मुलभूत गरजा पूर्ण करणेही अवघड झाले आहे. याच परस्थितीचे भान राखत एका अवलियाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या वर्षश्राध्द दिवशीच अनाथ बालकांना शिक्षणासाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांचे राष्ट्रीय बचतीचे प्रमाणपत्र देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे कौटुंबिक नुकसान काय होते याची प्रचिती आल्यानेच अहमदनगर जिल्ह्यातील सोनाई येथील होशिंग कुटूंबियांनी ही मदत अनाथ मुलांसाठी केली आहे. अनिल होशिंग याचे गतवर्षी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या प्रथम वर्षाश्राध्दाचे निमित्त साधून अभिजीत होशिंग या हा अनोखा उपक्रम राबलेला आहे.
शिक्षणासाठी 5 मुलांना 50 हजाराची मदत
कोरोनात मृत्यू झालेल्या वडिलांचे वर्षश्राद्ध करताना केवळ धार्मिक विधी न करता कोविडने बळी घेतलेल्या पालकांच्या मुलांना अभिजीत होशिंग यांनी आर्थिक मदत केली आहे. भविष्यातील शिक्षणासाठी 5 अनाथ मुलांच्या नावाने 10 हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन पुढील शिक्षणाचा मार्ग सुखकर केला आहे. एकीकडे सरकार आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबीयांना 50 हजाराची मदत करणार आहे. त्याआगोदरच हा आदर्श उपक्रम अभिजीत होशिंग यांनी समाजासमोर ठेवला आहे.
मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून केली मदत
आई-वडीलानंतर अनाथ मुलांच्या शिक्षणाचा मार्ग खूप खडतर राहतो. अनेकांना शिक्षणही घेता येत नाही. आणि सध्या शिक्षणाशिवाय काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे वडिलांचे तर कोरोनामुळे निधन झाले आहे त्यामुळे काय यातना असतात याचा मला अनुभव आहे. केवळ आर्थिक अडचणीमुळे कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये म्हणून ही मदत केली असल्याचे अभिजीत होशिंग यांनी सांगितले.
या प्रेरणेमुळे शक्य झाली मदत
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना मदत मिळावी यासाठी हेरंब कुलकर्णी हे अभिजीत होशिंग याचे मामा चळवळ उभारत आहेत. त्यामुळेच आपल्या वडीलांचे साजरे केलेले वर्षश्राद्ध इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असा उपक्रम करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. परदेशातील भारतीयांनी आणि महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती अभिजीत होशिंग यांच्या प्रमाणे मुलांना दत्तक घेऊन राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले तर या मुलांच्या शिक्षणाची भावी काळात सोय होऊ शकते अशी अपेक्षा हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केलीय.
