फ्लॅटचे फोटो पाठवले, डिपॉझिट भरण्यास सांगितलं, तिने एक क्लिक केलं अन्… तरुण महिलेसोबत काय घडले?
ऑनलाइन फ्लॅट शोधणे एका महिलेला महागात पडले. एका सायबर गुन्हेगाराने 'नो ब्रोकर' ॲपद्वारे तिच्याशी संपर्क साधून २.३८ लाख रुपयांची फसवणूक केली. फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली विविध बहाण्यांनी पैसे उकळले.

डिजीटल युगात घरबसल्या सुविधा मिळवणे सोपे झाले आहे. आता सायबर गुन्हेगार याच सुविधेचा वापर करून सर्वसामान्यांना लुटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चितोडा येथील एका महिलेला ऑनलाईन ॲपवर फ्लॅट शोधणे चांगलेच महागात पडले आहे. एका अज्ञात भामट्याने रमाकांत कुमार असे बनावट नाव सांगत या महिलेची २ लाख ३८ हजार ३९९ रुपयांची फसवणूक केली आहे.
नेमकी घटना काय?
चितोडा येथील रहिवासी कल्याणी नितीन महाजन (२९) या आपल्या कुटुंबासाठी भाड्याने किंवा खरेदीसाठी फ्लॅटच्या शोधात होत्या. ६ डिसेंबर रोजी त्यांनी नो ब्रोकर (No Broker) या नामांकित ॲपवर फ्लॅट पाहण्यास सुरुवात केली. सायबर भामटे अशा ॲप्सवर नजर ठेवूनच असतात, याची कल्पना कल्याणी यांना नव्हती. कल्याणी महाजन यांनी फ्लॅटमध्ये रस दाखवताच आरोपी रमाकांत कुमार याने त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपीने अत्यंत व्यावसायिक भाषेत बोलून सुरुवातीला कल्याणी यांचा विश्वास जिंकला. त्याने कल्याणी यांना फ्लॅटचे फोटो पाठवून तो फ्लॅट बुक करण्यासाठी घाई केली.
यावेळी आरोपी रमाकांतने बुकिंगचा बहाणा कर सुरुवातीला टोकन अमाऊंट म्हणून काही रक्कम मागितली. त्यानंतर सोसायटीचे नियम आहेत असे सांगून मोठी अनामत रक्कम डिपॉझिट म्हणून भरण्यास सांगितले. यानंतर पैसे ट्रान्सफर झालेले नाहीत, काहीतरी अडचण होत आहे, ही रक्कम रिफंडेबल आहे, जी प्रक्रियेनंतर परत मिळेल, असे वारंवार सांगत त्याने पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. ६ डिसेंबर दुपारी २ वाजल्यापासून ७ डिसेंबरपर्यंत हा पैशांचा खेळ सुरू होता. कल्याणी यांनी विश्वासाने एकूण २,३८,३९९ रुपये आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यावर पाठवले.
मात्र पैसे पाठवूनही फ्लॅटचे कोणतेही अधिकृत कागदपत्र किंवा पत्ता न मिळाल्याने कल्याणी महाजन यांना संशय आला. त्यांनी संबंधित व्यक्तीला फोन केला असता त्याने टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर शेवटी फोन बंद करून टाकला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कुटुंबासह यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली. १५ डिसेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
सायबर तज्ज्ञ काय म्हणाले?
पोलीस उपनिरीक्षक मसलोदिन शेख या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून, ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले, त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर सायबर तज्ज्ञांनी एक मोठा सल्ला दिला आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः घर किंवा फ्लॅट मालकाला भेटत नाही आणि जागा पाहत नाही, तोपर्यंत एक रुपयाही देऊ नका. खूप मागणी आहे, आताच पैसे भरा नाहीतर फ्लॅट बुक होईल, असे सांगणाऱ्यांपासून सावध राहा. तसेच पैसे मिळवण्यासाठी किंवा रिफंडसाठी कोणी क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करायला सांगत असेल, तर तो फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो, असे सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.
