तीन नंबरचा लालबावटा फडकला, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या समुद्रात… मोठं संकट येताच हवामान विभागाचा अलर्ट जारी
Cyclone Montha Update : मोंथा चक्रीवादळाचा परिणाम सध्या राज्यावर दिसतोय. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस होत असून वारेही सुटले आहे. हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत.

मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मोंथा चक्रीवादळाचा मोठा धोका आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चौथ्या दिवशीही जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येतोय. मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. किनारपट्टी भागात वेगवान वारे ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वाहणार. आज देखील मच्छीमारांना खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातलेले असतानाच आता या चक्रीवादळामुळे अनेक भागात जोरदार पाऊस होतोय.
यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जातंय. किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ हवामान आहे. काल रात्री देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आणखीन दोन दिवस कोकण किनारपट्टीवरती पावसाची शक्यता आहे. रायगडमध्येही समुद्र खवळलेला असून उंच लाटा येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून तीन नंबरचा लालबावटा फडकवण्यात आला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव सर्व मच्छीमारांनी आपल्या नौका किनारी लावल्या असून समुद्रात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही तासांमध्ये पावसाची व वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटरा गणपतीपुळे किनाऱ्याला बसला. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर जोरदार वादळी वारे वाहत आहे. गणपतीपुळ्यातील समुद्र खावळला आहे.
किनाऱ्यावरील पर्यटकांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वादळ सदृश्य परिस्थित निर्माण झाली. सध्या रत्नागिरीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्राचे रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता देखील आहे.
