Eknath Shinde: घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर? नेमकं कारण काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी तातडीने दिल्लीला जाणार जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दौऱ्याबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊयात.

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी तातडीने दिल्लीला जाणार जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत आज उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे. त्यामुळे भाजपसह एनडीएचे सर्व बडे नेते आणि खासदार सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला खास महत्व प्राप्त झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता
समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला जाणार आहे. आज उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे. संध्याकाळी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांचे अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली ते सीपी राधाकृष्णन यांच्यासह भाजप आणि मित्रपक्षांच्या महत्वाच्या नेत्यांची भेटही घेण्याची शक्यता आहे. या भेटीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा होऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा हा दौरा खास ठरण्याची शक्यता आहे.
दिल्ली दौरा नेहमी चर्चेत
दरम्यान, याआधीही एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेत राहिलेला आहे. त्यांनी दिल्लीत अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतलेली आहे. राज्यात किंवा युतीत जेव्हा एखादे संकट येते त्यावेळी एकनाथ शिंदेंनी धाव घेतल्याचे पहायला मिळाले आहे. आजच्या दौऱ्यातही ते भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेऊ शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या आजच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीत श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
शिवसेना खासदार एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. एनडीएने श्रीकांत शिंदे यांची आपला उमेदवार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. या निवडणुकीपूर्वी शिवसेना खासदारांची एक बैठकही पार पडली. या बैठकीनंतर डॉ. शिंदे यांनी सी.पी. राधाकृष्णन यांच्या मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.
