तो रडत मला म्हणाला… शौर्यसोबत शेवटच्या क्षणी नेमकं का घडलं? धक्कादायक खुलासा समोर
दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील १६ वर्षीय शौर्य पाटील या विद्यार्थ्याने शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्या सुसाईड नोटमध्ये शिक्षकांनी मानसिक त्रास दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. या घटनेनंतर तीव्र आंदोलने सुरु झाले.

दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीत शिकणाऱ्या शौर्य प्रदीप पाटील (१६) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येनंतर गेल्या दोन दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरु आहे. शौर्यला न्याय मिळावा आणि दोषी शिक्षकांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात आज पालकांसोबतच शाळा सुटल्यानंतर विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर येथील मूळ रहिवासी असलेल्या शौर्यने मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून उडी मारत जीवन संपवले. शाळेतील शिक्षकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या सुसाइड नोटमधून स्पष्ट झाले आहे. शौर्यच्या स्कूल बॅगमध्ये पोलिसांना दीड पानाची सुसाईड नोट सापडली आहे. यात त्याने स्पष्टपणे शिक्षकांनी छळ केल्याचा उल्लेख केला आहे.
“मेरा नाम शौर्य पाटील हैं… आय अॅम व्हेरी सॉरी. आय डीड धीस. पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया. सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं. स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू.” असे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. शौर्यने शिक्षकांच्या जाचाला कंटाळून हे कृत्य केल्याचे स्पष्ट होते.
शौर्य मोकळ्या स्वभावाचा होता
या सुसाईड नोटच्या आधारावर राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल यांच्यासह मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या चार शिक्षिकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शौर्यच्या आत्महत्येनंतर त्याचे अनेक मित्र आंदोलनात सहभागी झाले होते. शौर्य मोकळ्या स्वभावाचा होता, त्याने असे करायला नको होते, अशी प्रतिक्रिया त्याच्या मित्राने दिली.
तसेच एका विद्यार्थ्याने काल झालेल्या आंदोलनाबाबत गंभीर प्रतिक्रिया दिली. आम्ही आंदोलनात सहभागी झालो तर तुम्हाला शाळेतून काढून टाकू अशी धमकी काल युक्ती महाजन या शिक्षिकेने दिली होती, असा दावा एका विद्यार्थ्याने केला आहे. त्याच्या पालकांनी शौर्यची शेवटची इच्छा पूर्ण व्हावी आणि दोषी शिक्षकांवर कडक कारवाई व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
तर मी त्याला घरी घेऊन गेले असते
आता याप्रकरणी शौर्यसोबत शेवटच्या वेळी सोबत असलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्यासोबत रिक्षाने शौर्य आला होता, सोबत असताना तो रडत होता. तो मला म्हणाला तुमच्या मुलाला या शाळेतून काढून टाका, कारण शिक्षिका खूप त्रास देतात. त्याच्याकडे जायला पैसे देखील नव्हते, मी त्याचे पैसे दिले. जर असे तो काही करणार हे मला समजले असते, तर मी त्याला घरी घेऊन गेले असते किंवा त्याच्या पालकांना बोलावले असते. दुसऱ्या दिवशी बातम्या पाहिल्यावर मला त्याने आत्महत्या केल्याचे समजले. ते ऐकून खूप वाईट वाटले, असे त्या व्यक्तीने सांगितले.
दरम्यान मूळचे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी असलेल्या शौर्यच्या वडिलांना ही दुर्दैवी बातमी त्यांच्या गावी असताना मिळाली. त्यानंतर ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. काल २० नोव्हेंबर २०२५ रोजी शौर्य पाटील याच्यावर त्याच्या मूळगावी ढवळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर आणि पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
