हे तिसऱ्यांदा घडलंय… अजित पवारांचा संयम तुटला? माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आणि मुख्यमंत्री आणि स्वतः मिळून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

सध्या राज्याच्या राजकारणात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन विरोधकांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी, अशी टोलेबाजीही केली जात आहे. आता या कृषीमंत्र्यांच्या व्हिडीओवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी नुकतंच विविध विकास कामांच्या बैठकांना हजेरी लावली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही मिळून याबद्दलचा निर्णय घेऊ, असे अजित पवारांनी म्हटले.
मला ते अद्याप भेटलेले नाहीत
“मला कृषीमंत्र्यांच्या त्या व्हिडीओबद्दल जी माहिती मिळाली, ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे. विधीमंडळाचा जो काही परिसर आहे तो राम कदम आणि राहुल नार्वेकर यांच्या अखत्यारीत येतो. त्यांनीही त्याबद्दलची चौकशी लावलेली आहे, अशी माझी माहिती आहे. नक्की तिथे काय घडलं, याबद्दल चौकशी सुरु आहे. मला ते अद्याप भेटलेले नाहीत”, असे अजित पवार म्हणाले.
“येत्या सोमवारी ते कदाचित मला भेटतील. याबद्दल आम्ही मागेही चर्चा केली होती की प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आहे, आपण भान ठेवून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत, अशा सक्त सूचना प्रत्येक पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या नेत्यानी दिल्या आहेत. मागेही त्यांच्याकडून एकदा असंच घडलं होतं, तेव्हा मी दखल घेतली होती आणि त्यांना समज दिली होती. यानंतर परत दुसऱ्यांदा घडलं, त्यावेळीही मी त्यांना जाणीव करुन दिली होती. इजा झालं, बिजा झालं, तीजाची वेळ आणून देऊ नका. पण आता याबाबतीत ते म्हणतात की मी हे करत नव्हतो. नक्की काय हे निष्पन्न होईल”, असेही अजित पवारांनी म्हटले.
असं वक्तव्य कोणाकडूनही होता कामा नये
“सोमवारी किंवा मंगळवारी त्यांना बोलवून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्यावर निर्णय घेईन. जर यात तथ्यता आढळली तर तो आमच्या अखत्यारीतील निर्णय असेल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही मिळून याबद्दलचा निर्णय घेऊ. बाकी कोण काही बोलतंय याला काहीही घेणं देणं नाही. शेवटी याबाबतीत आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही मंत्र्याकडून, राज्यमंत्र्यांकडून, नेत्यांकडून महायुतीला काहीतरी कमीपणा येईल, असं वक्तव्य कोणाकडूनही होता कामा नये”, असेही अजित पवारांनी सांगितले.
