मनोज जरांगे यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे एका वाक्यात उत्तर

Manoj Jarange Patil | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील आंधळी धरणावर आले होते. मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याबद्दल त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देऊन बोलणे टाळले.

मनोज जरांगे यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे एका वाक्यात उत्तर
devendra fadnavis and manoj jarange patil
| Updated on: Feb 26, 2024 | 9:20 AM

दिनकर थोरात, कराड, दि. 25 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणाचा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मला संपवण्याचा डाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते सगेसोयऱ्याचे आरक्षण देऊ देत नाही. त्यांनी पक्षातील लोकांना संपवले आहे. ते कोणाला मोठे होऊ देत नाही. महादेव जानकर यांनाही त्यांनी मोठे होऊ दिले नाही. त्यांच्या बामणी कावा आता चालणार नाही, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना शिविगाळ केली. त्यानंतर समाजातील लोक व्यासपीठावर येऊन त्यांची समजूत घालू लागले. त्यांना शांत केले. या प्रकारानंतर मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे येण्यास निघाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील आंधळी धरणावर आले होते. मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याबद्दल त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देऊन बोलणे टाळले. फडणवीस म्हणाले की, ‘मनोज जरांगे काय बोलले मी ऐकलेच नाही. यामुळे मी कशा कशाला उत्तर देऊ.’

आमदार नितेश राणे म्हणाले…

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन नेमकं कशासाठी आहे. मराठा समाजासाठी आहे की फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी आहे. जरांगे पाटील यांना या संपूर्ण प्रकरणाची स्क्रिप्ट नेमकी कुठून आली आहे. सगे सोयऱ्यांच्या आरक्षणाबाबत सरकार कधी ना कधीतरी तोडगा काढेल? परंतु या निमित्ताने फडणवीस यांना टारगेट करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे सागर बंगल्याच्या बाहेर आम्ही देखील आहोत. त्या ठिकाणी आमची एक भिंत असेल. त्यामुळे त्याचा विचार जरांगे यांनी करावा. त्यांना पहिल्यांदा आमची भिंत पार करावी लागणार आहे, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

आनंद दवे म्हणतात, जरंगे विकृत होत चालले आहेत

हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जरंगे विकृत होत चालले आहेत. शेवटी त्यांना देवेंद्र यांची जात आठवली. मराठा समाजाला पहिले आरक्षण त्यांनीच दिले होते. याच ब्राह्मण उपमुख्यमंत्री असलेल्या सरकार कडेच तुम्ही मागण्या करत आहात. लोकांना फसवणे त्यांनी बंद करावे.