सुधीर मुनगंटीवार यांचं सरकारमध्ये कमबॅक होणार? देवेंद्र फडणवीस यांचे संकेत काय?
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपा पक्षाची पिछेहाट झालेली पाहायला मिळाले. निकाल समोर आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली. आता याच नाराजीवर फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

Devendra Fadnavis On Sudhir Mungantiwar : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्याचे दिसत आहे. भाजपाच्या 118 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे शिंदे गटानेही 58 नगराध्यक्षदपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यापाठोपाठ अजित पवारा यांच्या राष्ट्रवादीचे 37 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र अकरा नगरपरिषदांपैकी बहुसंख्य ठिकाणी भाजपाची पिछेहाट झाली आहे. अन्य ठिकाणी भाजपाने चांगली कामगिरी केली असली तरी, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मात्र भाजपाला फारसे चांगले प्रदर्शन केलेले नाही. हा निकाल समोर येताच भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदावरून नाराजी व्यक्त केली. तसेच विदर्भातील चार जिल्ह्यांमधील एकाही भाजपा नेत्याला मंत्रिपद देण्यात आलेले नाही, अशी खदखद मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली. आता मुनगंटीवार यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. त्यांनी केलेल्या एका विधानामुळे आता मुनगंटीवार यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
मुनगंटीवार यांनी कोणती खदखद व्यक्त केली
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले. तसेच या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले, असेही मत व्यक्त केले. यावेळी त्यांना सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीबाबत विचारण्यात आले. चार जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. मलाही मंत्रिपद मिळाले नाही. तसेच भाजपातर इतर पक्षातील लोकांना प्रवेश देण्यात आला, अशी खदखद मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना फडणवीस यांनी मोठे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत आम्ही मुनगंटीवार यांना ताकद पुरवू असे फडणवीस म्हणाले आहेत.
जिथे अपयश आलं, तिथे…
नागपूर जिल्ह्यात आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचं यात विशेष श्रेय आहे. त्यांनी एका एका नगरपालिकेत लक्ष घालून काम केलं. त्यांनी ३०-३५ वर्षात पहिल्यांदाच कामठीत नगराध्यक्ष निवडून आला आहे. गडचिरोलीतही चांगलं यश आलं. १५ नगर पालिकेत आम्ही मेजॉरीटीत आलो. दुर्देवाने कमी मताने आम्ही तिथे पडलो. चंद्रपूरच्या ज्या नगरपालिकेत यश आलं नाही त्या कारणांची मिमांसा करू. महापालिकेची निवडणूक आहे, तिथे कुठे कमतरता राहिली ती दूर करू, असे फडणवीस म्हणाले.
सुधीर भाऊंना ताकद देऊ
तसेच पुढे मुनगंटीवार यांच्या नाराजीविषयी बोलताना, पक्षाला दार असूच नये. पक्षाची दारं कोणत्या समाजासाठी, व्यक्तीसाठी बंद असू नयेत. पक्ष बिनदाराचा असला पाहिजे. प्रवेश देताना व्यक्ती योग्य आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. पक्षाने काही लोकांना प्रवेश दिला असेल तर त्याचा फायदाच झाला आहे. सुधीर भाऊंना ताकद कमी पडली असेल तर पुढच्या महापालिकेत आम्ही ताकद देऊ, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले. त्यामुळे आता मुनगंटीवार यांना नेमकी कोणती ताकद मिळणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
