राजीनामा द्या, नाहीतर.. ; मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर मुंडेंनी राजीनामा दिला?
धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीनंतर दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाट आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसोबत जवळकीचे संबंध असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास याबद्दल राज्यपालांना पत्र लिहावं लागेल आणि मंत्रीमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतरच आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याचं देखील समजलं आहे. मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी फडणवीस आधीपासून आग्रही होते. यापूर्वी 3 ते 4 वेळा त्यांनी अजित पवार यांच्यासोबत देखील चर्चा केली होती. याबद्दल फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना देखील समजावलं होतं. पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर राजीनामा द्या अन्यथा राज्यपालांना पत्र लिहून कारवाई करत मंत्रीमंडळातून काढून टाकावं लागेल, अशी धमकीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल रात्रीच्या या इशाऱ्यानंतर मुंडे यांनी आज सकाळी राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.