माझ्याशी रिलेशनशिप ठेव नाहीतर… डोंबिवलीत अल्पवयीन मुलीला धमकी, वाचा काय घडलं?
डोंबिवलीत १९ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला चार-पाच महिने सतत ब्लॅकमेल केले. त्याने तिला रिलेशनशिपसाठी जबरदस्ती केली आणि नकार दिल्यास स्वतःहून नस कापण्याची धमकी दिली. त्याच्या विरोधात टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

कल्याणमध्ये एका परप्रांतीय तरुणाने एका मराठी तरुणीला बेदम मारहाण केल्याच्या घटनेमुळे सध्या वातावरण तापलं आहे. या घटनेवरुन सध्या राजकारण तापलेले असताना दुसरीकडे डोंबिवलीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका १९ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा तरुण सलग चार-पाच महिने तिचा पाठलाग करत होता. या तरुणाने त्या तरुणीला रिलेशनशिप न ठेवल्यास स्वतःची नस कापून घेईन, अशी धमकीही दिली होती. या विकृत तरुणाला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी रमेश राठोड (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथे राहणारी आहे. स्वामी राठोड हा गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तिचा कॉलेज आणि इतर ठिकाणी सातत्याने पाठलाग करत होता. तो तिला रिलेशनशिप ठेवण्यासाठी वारंवार जबरदस्ती करत असे. एवढेच नाही, जर नकार दिला तर स्वतःच्या हाताची नस कापून घेईन, अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत होता. कॉलेज आणि इतर ठिकाणी जात असताना त्याने त्याचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांची तातडीची कारवाई
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने कुटुंबियांना याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी मंगळवारी रात्री टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच, टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम आणि पोलीस उपनिरीक्षक तेजल पवार यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी स्वामी राठोडला रात्रीच अटक केली. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याबद्दलचा पुढील तपास करत आहेत.
कल्याण-डोंबिवलीकरांच्या प्रतिमेला धक्का
कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वी एका क्लिनिकमध्ये परप्रांतीय तरुणाने महिला रिसेप्शनिस्टला केलेल्या मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच, डोंबिवलीतील या घटनेमुळे शहराची प्रतिमा डागाळली आहे. महिला सुरक्षित आहेत की नाहीत, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. या दोन्ही घटनांमुळे समाज ढवळून निघाला आहे. महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
