मंगेश चिवटे लढणार; एबी फॉर्म घेतला, एकनाथ शिंदेंकडून थेट घोषणा, पुण्यातील जागेसाठी महायुतीत जुंपली
Pune Graduate Constituency: पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मंगेश चिवटे लढणार असल्याची एकनाथ शिंदेंनी घोषणा केली आहे. यामुळे आता महायुतील संघर्ष अधिक वाढला आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला गेले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदींमध्ये एक तास चर्चा झाली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मी पंतप्रधानांसोबत महाराष्ट्रातील दुष्काळासंदर्भात बोललो आहे. ते महाराष्ट्राला जमेल तशी मदत करणार आहेत. असं आश्वासन मोदींनी मला दिले आहे, असं शिंदेंनी सांगितलं आहे. यानंतर विधानपरिषद निवडणुकीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आज नरेंद्र मोदींसोबत बरीच चर्चा झाली. माझी त्यांच्यासोबत चर्चा होत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाची मोदींनी माहिती घेतली आहे. पाणी आणि चाऱ्याची काय परिस्थिती आहे? कुठे आणि किती नुकसान आहे? अशा सगळ्या विषयांवर चर्चा केली. मी त्यांना सांगितलं, अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. मंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला होता. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांनी पुण्याची जागा मंगेश चिवटे लढणार, असे ठामपणे सांगितलं आहे. यासाठी त्यांनी एबी फॉर्म घेतला असल्याचे यावेळी शिंदेंनी सांगितलं आहे.
ते म्हणाले की, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना आम्ही हात आकडता घेणार नाही. नरेंद्र मोदी सरकारचे २५ वर्ष पूर्ण होत आहेत. हा अतिशय मोठा पल्ला आहे. नरेंद्र मोदी एकही दिवस सुट्टी घेत नाहीत. असा प्रधानमंत्री देशाला लाभला आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. अशा स्थितीत भारताची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणलेली आहे. देशाचे हित प्रथम असा त्यांचा अजेंडा आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नरेंद्र मोदींचं कौतुक केले आहे.
एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, आरोप करणं सोपं आहे पण ज्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडणुकीत गाडून टाकले आहे, ते गाडण्याची भाषा करत आहेत. पंतप्रधान देशाला पुढे नेत आहे. देशाचा विकास करत आहेत. पंतप्रधानांबाबत एवढी जळजळ का? त्यांच्याबद्दल सन्मान असला पाहिजे, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली आहे.
ते पुढे म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागे घेण्यासाठी अजून वेळ आहे. या मधल्या काळात महायुतीची चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होणार आहे. पण पुण्याच्या जागेवरून मंगेश चिवटे लढणार आहेत. त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. महायुतीत चर्चा झाली होती.