
Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडा. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आले होते. या मेळाव्यात शिंदे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनीही भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले आहेत. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला? याचा तपास करावा , अशी खळबळजनक मागणी रामदास कदम यांनी केली आहे. त्यांच्या या विधानांची आता राज्यभर चर्चा होत आहे.
आपल्या भाषणात रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर काही विधानं केली. “शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे. मी हे विधान जबाबदारीने करतो आहे. मी हे फार मोठं विधान करतो आहे,” असे रामदास कदम आपल्या भाषणात म्हणाले. तसेच शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर सध्या आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. दोन दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता. त्यांचं अंतर्गत काय चाललं होतं? असा सवालही कदम यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना, “मी त्या काळात आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो आहे. मला सगळं कळत होतं. पण हे सारं कशासाठी करण्यात आलं. मला कोणीतरी सांगितलं की माँसाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते. मग हे ठसे कशासाठी घेण्यात आले होते. नेमकं काय होतं? मातोश्रीमध्ये सगळी चर्चा चालू होती,” असे विधान रामदास कदम यांनी केले. यापुढेही जाऊन बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्युपत्र कोणी केलं? हे मृत्युपत्र कधी झालं? त्यात सही कोणाची होती? असा सवाल करत त्यांनी या सर्व गोष्टींची माहिती काढावी, अशी खळबळजनक मागणीही रामदास कदम यांनी केली.
पुढे बोलताना तुम्ही आम्हाला काय शिकवता, शिवसेना आम्ही मोठी केली. आम्ही तुरुंगात गेलो. तुम्ही आम्हालाच संपवताय. तुम्ही मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते, रामदास कदम यांना संपवले. ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे लागले, असा हल्लाबोलही कदम यांनी ठाकरे यांच्यावर केला.