मराठा आरक्षणावरून राज ठाकरे-एकनाथ शिंदे आमनेसामने, त्या टीकेला शिंदेंकडून चोख प्रत्युत्तर!

जरांगे यांच्या या आंदोलनामुळे आता राज्यातील इतर सर्वच विषय मागे पडले आहेत. प्रमुख नेतेदेखील या आंदोलनावर लक्ष ठेवून असून ते यावर बोलत आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील माध्यम प्रतिनिधींना मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आता राज ठाकरे यांच्या याच टीकेला एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

मराठा आरक्षणावरून राज ठाकरे-एकनाथ शिंदे आमनेसामने, त्या टीकेला शिंदेंकडून चोख प्रत्युत्तर!
raj thackeray and eknath shinde
| Updated on: Aug 31, 2025 | 9:43 PM

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. मुंबईच्या आझाद मैदानावरील त्यांच्या उपोषणाला तीन दिवस झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. पण सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास राज्यात ओबीसींमध्ये मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता राज्य सरकार कात्रीत सापडले आहे. जरांगे यांच्या या आंदोलनामुळे आता राज्यातील इतर सर्वच विषय मागे पडले आहेत. प्रमुख नेतेदेखील या आंदोलनावर लक्ष ठेवून असून ते यावर बोलत आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील माध्यम प्रतिनिधींना मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आता राज ठाकरे यांच्या याच टीकेला एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती. खरं म्हणजे मराठ्यांचं आरक्षण ज्यांच्यामुळे गेले त्यांनाच ते का गेले हे राज ठाकरे यांनी विचारायला हवे होते. तुम्ही मराठ्यांना आरक्षण देण्यात अयशस्वी कसे झाले? हे राज ठाकरे यांनी त्यांना विचारायला हवे होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. आम्ही ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. मात्र महाविकास आघाडी तेच आरक्षण सर्वोच्च न्यायालयात का टिकवून शकली नाही, हा प्रश्न राज ठाकरेंनी विचारायला हवा होता, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.

अनेक मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्रं दिली

तसेच, पण ठीक आहे. लोकांना आम्ही काय केलं हो समजावं म्हणून मी हे सांगत आहे. आम्ही मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखील समितीची स्थापना करून आपण अनेक मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्रे दिली. शिंदे समितीने 1967 पूर्वीच मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी शोधल्या. त्याचाही लाभ मराठा समाज घेत आहे, अशी माहितीही एकनात शिंदे यांनी यावेळी दिली.

जरांगेंच्या मागण्यांवर काय तोडगा निघणार

दरम्यान, आता जरांगे यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचा अभ्यास चालू आहे. तसेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समितीदेखील काय तोडगा शोधता येईल, यावर अभ्यास करत आहे. त्यामुळे आता भविष्यात जरांगे यांच्या मागण्यांचे काय होणार? सरकार जरांगे यांचे समाधान करू शकणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.