अखेर साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; उद्घाटनाला मुख्यमंत्री ठाकरे अन् समारोपाला शरद पवार!

संमेलनाचा समारोप 5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

अखेर साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; उद्घाटनाला मुख्यमंत्री ठाकरे अन् समारोपाला शरद पवार!
शरद पवार आणि उद्धव ठाकरे.


नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बहुचर्चित कार्यक्रम पत्रिका अखेर गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार 3 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर (Jayant Narlikar), मावळते संमेलन अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), प्रमुख पाहुणे गीतकार जावेद अख्तर आणि उद्घाटक साहित्यिक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. संमेलनाचा समारोप 5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पहिला दिवस

शुक्रवार 03 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वा. ग्रंथदिंडी निघेल. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिकळवाडी, नाशिक येथून निमाणी बस स्टँडपर्यंत पायी जावून तेथून वाहनांनी कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिकच्या प्रवेशद्वारापर्यंत जाईल. तेथून परत दिंडी पायी संमेलन स्थळापर्यंत जाईल. संमेलनस्थळी सकाळी 11.00 वा. ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. दुपारी 4.00 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रथा व परंपरेनुसार स्वागताध्यक्षांचे भाषण, 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचा आणि उपस्थित संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार, 93 व्या संमेलनाच्या अध्यक्षांचे मनोगत आणि नवीन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान कार्यक्रम, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण होईल. सुरुवातीला स्वागत गीत, संमेलन गीत आणि अखेरीस आभार प्रदर्शन असेल. रात्री 9 वा. निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होईल.

दुसरा दिवस

सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनाचे श्री. दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. महामंडळाच्या वतीने एका ज्येष्ठ लेखक व प्रकाशक यांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी नाशिकचे ज्येष्ठ लेखक, नाटककार, कांदबरीकार मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनात ‘संवाद लक्षवेधी कवींशी’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. लक्षवेधी कवी म्हणून सर्वश्री प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम (सौमित्र), सुचिता खल्लाळ, खालील मोमीन आणि वैभव जोशी या कवींसमवेत विश्वाधार देशमुख आणि गोविंद काजरेकर हे त्यांचा काव्यप्रवास उलगडून दाखविणार आहेत.

परिचर्चा, कथाकथन, परिसंवाद

दुपारच्या सत्रात ‘स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळक’ या विषयावर परिचर्चा आयोजित केली आहे. या चर्चेचे सूत्रधार डॉ. एकनाथ पगार आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी, रेखा इनामदार साने, डॉ. गजानन जाधव आणि डॉ. मोना चिमोटे हे सहभागी होणार आहेत. दुपारच्या सत्रात कथाकथनाचा कार्यक्रम विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. आघाडीचे कथाकार गिरीश देसाई, विद्याधर बनसोड, बाबासाहेब परीट, राजेंद्र गहाळ हे आपल्या कथा सादर करतील. कथाकथनाचे प्रात्यक्षिक म्हणून हा साहित्य संमेलनात महत्वपूर्ण कार्यक्रम ठरणार आहे. सायंकाळी कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार या विषयावर जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे.

तिसरा दिवस

परिसंवाद : सकाळी ‘मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दोन पावले मागे’ शफ़ाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये वक्ते लता नार्वेकर, सर्वश्री. पराग घोंगे, डॉ. सतीश साळुंके, सुबोध भावे आणि प्राजक्त देशमुख यांस निमंत्रित केले आहे. सकाळी ‘शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्ताचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका ’ या भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये आ. बच्चू कडू, रमेश जाधव, मिलींद मुरुगकर व संजय आवटे यांचा सहभाग अपेक्षित आहे. दुपारी ‘ऑनलाईन वाचन – वाङमय विकासाला तारक की मारक’ हा परिसंवाद डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. परिसंवादात वक्ते म्हणून श्रृतीश्री वडगबाळकर, धनंजय गांगळ, श्रीमंत माने, डॉ. विलास साळुंके, मयूर देवकर यांचा सहभाग अपेक्षित आहे. दुपारी साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड – डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये वृषाली देशपांडे, डॉ. भगवान कारे, डॉ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफ़गाण, प्रा. भास्कर ढोके यांचा सहभाग असेल.

इतर बातम्याः

Nashik Gold| योगायोगाचे घबाड, सोने दीड अन् चांदी 4 हजारांनी स्वस्त, वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत गोड झाला!

Nashik| मध्यरात्री 12 दरोडेखोरांचा हैदोस, घरमालक गंभीर; 6 लाखांचा ऐवज लंपास, एकाला पाठलाग करून बांधले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI