‘साहेब मला माफ करा’, आज ठाकरे गटाचे पाच नगरसेवक फुटणार, मुंबईतही बसणार मोठा धक्का

पक्षातून सुरु झालेलं आऊटगोईंग रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आता सक्रीय झाले आहेत. येत्या 20 आणि 25 फेब्रुवारीला ते आमदार-खासदारांशी संवाद साधणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

साहेब मला माफ करा, आज ठाकरे गटाचे पाच नगरसेवक फुटणार, मुंबईतही बसणार मोठा धक्का
| Updated on: Feb 18, 2025 | 9:14 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे गटाचा मोठा संघर्ष सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. पक्षाला एकसंध कसं ठेवायचं? हे मोठं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे उभं राहिलं आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडे ओढा वाढत चालला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्ष संघटना वाढीकडे सर्वाधिक लक्ष देत आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे ओढा वाढण्यामागची दोन प्रमुख कारणं आहेत, पहिलं म्हणजे एकनाथ शिंदे हे सत्तेत आहेत, त्यामुळे जिल्हा पातळीवर विविध विकास काम मार्गी लावता येऊ शकतात. दुसरं कारण विधानसभेतील संख्याबळ.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 57 जागा जिंकल्या. तेच दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागलं. अनेकदा खरी शिवसेना कोणाची? ही डिबेट चालते. हे आकडे त्याचं अप्रत्यक्ष उत्तर आहेत. त्यामुळे राज्यभरातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

मुंबईतून कोण फुटणार?

मागच्या आठवड्यात रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आज सुद्धा रत्नागिरी-दापोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे पाच नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते वेगळा गट स्थापन करणार असून जिल्हा प्रशासनाला त्यांनी तसं पत्र दिलं आहे. येत्या 20 फेब्रुवारीला जितेंद्र जनावळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतील. जितेंद्र जनावळे हे विलेपार्ल्यातील ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख होते. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या नाराजीची चर्चा होती. पक्ष सोडताना ‘साहेब मला माफ करा’ असं पत्र त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. आगमी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामुळे ठाकरे गटासमोर आव्हान निर्माण होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us