भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू

Accident : रत्नागिरी, गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या 3 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात काही महिलांचाही समावेश आहे.

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू
Maharashtra Accident 5 Died
Image Credit source: Google
| Updated on: Jul 15, 2026 | 4:20 PM

राज्याच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर लांजा रेस्ट हाऊस इथे झालेल्या अपघातात अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला एक मुलगा यांचा समावेश आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने डंपरला मागून धडक दिल्यानंतर हा अपघात झाला आहे. या अपघातातील मृत प्रवासी हे मुंबईतील आगरी पाडा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

गोंदियात पिकअप बोलेरोच्या धडकेत 3 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे काल मंगळवारी आठवडी बाजार भरला होता. यावेळी बलमाटोला येथील रहिवासी लक्ष्मीचंद सेवईवार हे आपल्या 3 वर्षीय मुलगी कुमारी पासी सोबत बाजाराला आले होते. रात्री 8 वाजेच्या दरम्यान अचानक भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात मालवाहू बोलेरोने त्यांना जोराची धडक दिली आणि काटी मार्गाने पळ काढला. याच बाप लेक गंभीर जखमी झालेय. या जखमी बाप-लेकीला तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातानंतर संतप्त नातेवाईकांनी रावणवाडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात बोलेरो चालका विरोधात तक्रार दाखल केली. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी आरोपी आणि वाहन यांचा शोध घेण्याचा आश्वासन न दिल्याने पीडित वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह हातात घेऊन घटनास्थळी रस्त्यावर बसून तसेच नातेवाईक व गावकऱ्यांनी “पोलिस हाय हाय” च्या घोषणा दिल्या. घटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र तुरकर यांनी पीडित कुटुंबीयांसोबत रस्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर रावणवाडी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी भेट देऊन 1 दिवसात आरोपीला अटक करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टरने चिरडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर मधील पिसादेवी रस्त्यावरील एका सुपर मार्केटसमोर बेजबाबदार ट्रॅक्टर चालकामुळे एका कामगाराचा नाहक बळी गेला. रस्त्याने दुचाकीवरून किराणा सामान घेऊन घराकडे चाललेल्या कामगाराला पाठीमागून आलेल्या या भरधाव ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅक्टरचे चाक थेट कामगाराच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. रवींद्र बाजीराव पाटील (50, रा. सिंहगड कॉलनी, एन-6) असे मृत कामगाराचे नाव असल्याची माहिती हर्सूल ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी सांगितले.

रवींद्र पाटील हे मूळचे चाळीसगावजवळील भडगावचे रहिवासी होते. ते एका कंपनीत काम करत होते. मंगळवारी रात्री दुचाकीवरून किराणा सामान घेऊन ते पिसादेवी रस्त्याने परतत होते. त्याच वेळी मागून आलेल्या एका सुसाट ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. धडकेमुळे पाटील रस्त्यावर कोसळले आणि ट्रॅक्टरचे जड चाक त्यांच्या चेहऱ्यावरून गेले. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

Follow Us