VIDEO: यवतमाळमध्ये एकाच वेळी 26 चिता पेटल्या, आप्तेष्ट स्पर्शही करायला तयार नसताना अंत्यसंस्कार करणाऱ्यांची बातमी

यवतमाळमध्ये आप्तेष्ट स्पर्शही करायला तयार नसताना 800 पेक्षा अधिक अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांकडेच सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालंय.

VIDEO: यवतमाळमध्ये एकाच वेळी 26 चिता पेटल्या, आप्तेष्ट स्पर्शही करायला तयार नसताना अंत्यसंस्कार करणाऱ्यांची बातमी


यवतमाळ : आपल्या प्रिय लोकांना निरोप देण्यासाठी हजारो लोकांचा सहभाग असलेल्या अंत्ययात्रा अनेकांनी पाहिल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे परिस्थिती बदलली, जीवाच्या आकांताने रस्ता पार करणारी अॅम्बुलन्स स्मशानभूमीच्या दारावर शांत होऊन जात आहे. यवतमाळमध्येही असंच चित्र आहे. पीपीई कीट घातलेले दोन कर्मचारी मृतदेह घेऊन अॅम्बुलन्समधून उतरतात. अंतिम संस्कारासाठी सोपवून निघून जातात. जिथे आप्तेष्ठही मृतदेहाला स्पर्श करायला तयार नसताना ‘ते’ युवक मात्र कोणतीही भीती न बाळगता त्या मृतदेहाला पंचतत्वात विलीन करण्याची काळजी घेतात (Funeral on 26 corona patient in Yavatmal but corona warriors are neglected) .

गेल्या वर्षभरात आतापर्यंत 800 हून अधिक कोरोना बाधितांच्या मृतदेहावर त्यांच्या धर्मातील प्रथांप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. हे काम बजावणारे ते योद्धे आहेत अब्दुल जब्बार, शेख अहेमद, शेख अलीम आरीफ खान. आयुष्यभर जात, धर्म करणारा माणूस जेव्हा कलेवर होऊन पडतो तेव्हा त्याच्या अंतिम प्रवासाला सहाय्य करणारे हात हे केवळ माणसाचेच असतात. कोरोनामुळे झालेला मृतकाचा अंतिम संस्कार हा संवेदनांना गोठवून टाकणारा क्षण. परिस्थितीच अशी आहे की, आपले सुध्दा मृतदेहाला हात लावू शकत नाहीत. अशा परिस्थितीत परिवार, कुटूंब, धर्म, समाज बाजूला ठेवून अत्यल्प मेहनतान्यावर अंतिम संस्कारासाठी जीवाची बाजी लावणारे अत्यंत दुर्लक्षित कोरोना योद्धे म्हणजेच हे स्मशान भूमीतील कर्मचारी आहेत.

आप्तस्वकीयांना चेहराही पाहता येणे शक्य नसताना ‘ते’ अंत्यसंस्कार करतात

या कारोनाने आयुष्यात कधीही पाहिल्या नाहीत अशा सर्व गोष्टी दाखवून दिल्याचे अनेकजण अगदी सहज बोलून दाखवतात. सध्या असलेली भीषण परिस्थिती पाहता ही बाब खरी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. त्यातही कोरोनाचा संसर्ग होणे आणि कोरोनामुळे मृत्यू होणे या त्यापैकी सर्वात भयंकर गोष्टी. एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला, तर इष्ट-मित्र तर सोडाच पण घरातील व्यक्तीही बाधिताजवळ जाण्यासाठी विचार करताना दिसतात. इच्छा असतानाही काहींना तसे करता येत नाही. त्यातच मृत्यू झाल्यानंतर आप्तस्वकीयांना जिथे चेहराही पाहता येणे शक्य होत नाही तिथे अंत्यसंस्कार तर दूरचीच गोष्ट ठरते.

शेकडो कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर त्यांच्या धर्मातील चालीरितींप्रमाणे अंत्यसंस्कार

एखाद्या बेवारस व्यक्तीच्या मृतदेहावर संस्कार व्हावे तसे कुणीही आप्तस्वकीय हजर नसताना कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात. मात्र असे असतानाही कोरोनाचा संसर्गाचा धोका असूनही स्मशानामध्ये अशा शेकडो कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर त्यांच्या धर्मातील चालीरितींप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे काम अब्दुल जब्बार, शेख अहेमद, शेख अलीम आणि आरीफ खान हे चार युवक पार पाडत आहेत.

विशेष निधीची व्यवस्था नसताना लोकसहभागातून अंत्यसंस्कार

कोरोना संसर्गाचा धोका पाहता कोरोना बाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर सोपविली आहे. त्यामुळे कुठल्याही विशेष निधीची व्यवस्था नसताना पालिका प्रशासनातील डॉ. विजय अग्रवाल, अजयसिंह गहरवाल आणि अमोल पाटील यांनी लोकसहभागातून आतापर्यंत 500 पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी केवळ कर्तव्य म्हणूनच नाही तर एक माणुसकी म्हणून अत्यंत चोख पार पाडली.

माणुसकीचं काम करणारे सच्चे कोरोना योद्धे दुर्लक्षित

जिल्हा रुग्णालयातून मृतदेह घेऊन तो स्मशानातील चीतेपर्यंत पोहचवण्याचे आणि त्या ठिकाणी त्यावर योग्य अंत्यसंस्कार करुन घेण्याचे काम त्यांनी अविरत केले आहे. असे असले तरी ज्यावेळी कोरोना योध्यांचं नाव पुढे येतं त्यावेळी अत्यंत जोखमीचे आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचे काम करणारे सच्चे कोरोना योद्धे असलेले अब्दुल जब्बार सारखे युवक किंवा अजयसिंह गहरवाल यांच्यासारखे कर्मचारी अद्यापही उपेक्षित असल्याचं दिसून येतंय.

जीवाची पर्वा न करता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ 200 रुपये

याविषयी बोलताना अब्दुल जब्बार म्हणतात, “गेल्या वर्षीपासून आतापर्यंत आम्ही 500 पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोना बाधितांच्या जवळ जाण्यासाठी कुणी तयार नसताना आम्ही जीवाची पर्वा न करता माणुसकी म्हणून हे काम करतोय. मात्र, त्यासाठी आम्हाला एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ 200 रुपये देण्यात येतात. यासंदर्भात प्रशासनाने काहीतरी विचार करावा.”

यवतमाळच्या स्मशानभूमीत राबणाऱ्या या दुर्लक्षित कोरोना योध्यांच्या कार्याला सलाम.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

पोहरादेवीमध्ये संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

रेमडेसिव्हीरसाठी तडफडणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी, वर्धा येथील कंपनी उत्पादन सुरु करणार

बापरे ! मोदींच्या मंत्र्याच्या भावालाच बेड मिळेना, प्लीज मदत करा, ट्विटरवरुन आवाहन

Funeral on 26 corona patient in Yavatmal but corona warriors are neglected

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI