Ganesh Naik : महाराष्ट्राला बिल्डरांच्या नादी लागून 10 वर्ष मागे नेलं; मंत्री गणेश नाईक यांच्या निशाण्यावर कोण?
महायुतीमधील दोन नेत्यांमध्ये वाद पेटल्याचे समोर आलं आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

महायुतीमधील दोन प्रमुख नेत्यांमध्ये वाद पेटल्याचे दिसत आहे. मंत्री गणेश नाईक यांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘जनतेला गृहीत धरून कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा लोकांना दाखवेन. आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार तर त्याचा हात धरून लायकी दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, अशा शब्दात गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्राला मागे नेल्याचीही टीका केली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केलेय. या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला आहे. माझं कोणत्या व्यक्तीशी वाद नाही. मात्र जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल, असा समज ठेऊन कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक करेल. कोणी आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार असेल तर त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, अशा शब्दात खरमरीत टीका गणेश नाईक यांनी केली आहे. यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची चिन्ह आहेत.
शिंदे गटाच्या नेत्यांनी आंदोलन करण्याआधी…
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. मंत्री गणेश नाईक यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. गणेश नाईक यांच्यावरील टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. गणेश नाईक यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप शिंदे गटाने केला आहे. त्याला गणेश नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गणेश नाईक म्हणाले, तुम्ही आंदोलन का कराल, त्याची प्रश्नावली द्यावी. माझ्या समोरासमोर बसावे. त्यावेळी गणेश नाईक प्रश्न विचारतील. त्यावेळी उत्तर द्यावे, असं गणेश नाईक यांनी म्हटलं.
