बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्यांसाठी खास रो-रो सेवा सुरु, तिकीट किती, वेळापत्रक काय? जाणून घ्या A टू Z माहिती
गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने रो-रो सेवा सुरू केली आहे. ही सेवा कोलाड ते वेर्णा दरम्यान उपलब्ध आहे. या सेवेत प्रवासी आपली कार रेल्वेने नेऊ शकतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांचा त्रास टळतो.

गणेशोत्सवात दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे कोकण रेल्वे, एसटीचे आरक्षण फुल्ल होते. त्यासोबत रस्ते मार्गांवरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने यंदा एक खास भेट आणली आहे. खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील प्रवासाची दगदग यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि अनोखी ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ (Ro-Ro) सेवा दिली जाणार आहे. आज २३ ऑगस्टपासून ही सेवा सुरू झाली आहे. ही सेवा म्हणजे खासगी गाडीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक वरदानच ठरणार आहे.
‘रो-रो’ सेवा नक्की काय?
कोकण रेल्वेकडून सुरु करण्यात येणारी रो-रो सेवा ही चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहेत. या रो रो सेवेतंर्गत मालवाहू ट्रकप्रमाणे तुम्हाला तुमची कार नेण्याची सुविधा रेल्वेकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे वेळ, पैशाची बचत होणार आहे. तसेच वाहतूक कोंडी किंवा खराब रस्त्यांपासूनही तुमची सुटका होणार आहे. कोकण रेल्वेने सुरू केलेल्या रो-रो सेवेमुळे तुम्हाला तुमचे वाहन थेट रेल्वेच्या डब्यात ठेवून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे तुम्हाला आरामात रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
ही विशेष ‘रो-रो’ सेवा रायगड जिल्ह्यातील कोलाड येथून सुरू होऊन गोव्यातील वेर्णा या अंतिम स्थानकापर्यंत उपलब्ध असेल. या प्रवासाचे वेळापत्रकही प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचे ठेवण्यात आले आहे. ही विशेष रेल्वे सायंकाळी ५ वाजता गाडी कोलाडहून सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता वेर्णा येथे पोहोचेल. तसेच वेर्णा येथूनही सायंकाळी ५ वाजता ही गाडी सुटेल. यामुळे प्रवाशांना वेळेचे उत्तम नियोजन करता येईल. तसेच रात्रीच्या प्रवासात आराम करून सकाळी ताजेतवाने होऊन आपल्या गावी पोहोचता येईल.
प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
यासाठी एका कारसाठी 7 हजार 875 रूपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच तिघांना एसी कोच अथवा एसएलआर डब्यातून प्रवास करता येईल. मुख्य बाब म्हणजे कागदपत्रांची पूर्तता असेल किंवा प्रवासाशी निगडीत बाबींची पूर्तता करण्यासाठी कारसोबत प्रवाशांना किमान तीन तास अगोदर संबंधित स्टेशन्सवर हजर राहावं लागेल.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणे हे दरवर्षीच एक आव्हान असते. पावसाळ्यात खराब झालेले रस्ते, जागोजागी होणारी वाहतूक कोंडी, अपघाताची भीती आणि कासवगतीने होणारी वाहतूक यामुळे प्रवास कंटाळवाणा ठरतो. अनेकजण या त्रासापासून वाचण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. पण मग त्यांना खासगी वाहनाशिवाय कोकणात पोहोचावे लागते. आता मात्र कोकण रेल्वेने यावर एक अभिनव उपाय शोधला आहे. ‘रो-रो’ सेवेमुळे तुम्हाला तुमच्या खासगी गाडीसोबतच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे, गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचे नियोजन करणाऱ्या चाकरमान्यांनी लवकरात लवकर आपले आरक्षण करून घेणे महत्त्वाचे आहे.
