प्रेम प्रकरणाचा राग, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या आईची नग्न धिंड काढली

प्रेम प्रकरणाचा राग, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या आईची नग्न धिंड काढली

उस्मानाबाद : अत्यंत संतापजनक असा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातून समोर आलाय. मुलाचे प्रेम प्रकरण असल्याच्या कारणावरून त्याच्या आईची गावात धिंड काढल्याची घटना उस्मानाबाद जिह्यातील एका गावात घडली. या प्रकरणी पीडित कुटुंब दबावाखाली असल्याने त्यांनी तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.

या संबंधित गावच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षांनीही घटनेनंतर राजीनामा दिलाय. शिवाय संपूर्ण घटनेचा खुलासाही त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केला. मुलाचे प्रेम प्रकरण असल्याने मुलीच्या वडिलांसह त्याच्या कुटुंबाने शुक्रवारी पहाटे आईला मारहाण करत नग्न धिंड काढली.

या घटनेला पीडित महिलेच्या पती आणि मुलाने पुष्टी दिली आहे. मात्र त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. या संतापजनक प्रकारानंतर पीडित मुलगा आणि त्याची आई अत्यंत तणावाखाली आहेत. पोलिसांपर्यंत ही घटना पोहोचली असूनही अजून गुन्हा दाखल होण्याची वाट पाहिली जात आहे.

खरं तर एवढा संतापजनक प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत आरोपींना बेड्या ठोकणं अपेक्षित होतं. पण पोलीस अजून कुणी तक्रार दाखल करण्याची वाट पाहत आहेत. पीडित कुटुंब घाबरलेलं असल्यामुळे तक्रार दाखल करण्यासाठी ते अजून धजावलेले नाहीत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI