‘शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्तावच संजय राऊतांचा होता’, बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ
गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे, शिवसेनेते जेव्हा फूट पडली तेव्हा सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते, असा दावा त्यांनी केला आहे.

शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. शिवसेना फुटली तेव्हा सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते, मात्र त्यांना पक्षातील 30 ते 35 आमदारांनी विरोध केला असा दावा त्यांनी केला होता, शहाजी बापू पाटील यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेत फूट पडली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत हेच फुटणार होते, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेत फूट पडली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते, शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. मात्र ते त्यावेळेस थांबले, संजय राऊत सर्वात पहिले फुटणार होते, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
शहाजी बापू पाटील यांनी काय म्हटलं होतं
दरम्यान शनिवारी शहाजी बापू पाटील यांनी देखील संजय राऊत याच्यांबाबत असंच वक्तव्य केलं होतं. संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं, पण त्यांना आमदारांचा विरोध होता. त्यांना 30 ते 35 आमदारांचा विरोध होता. म्हणून राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. आजही उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य आहे, त्यामुळे लवकरच राजकीय घडामोडी घडतील असा दावा देखील शहाजी बापू पाटील यांनी यावेळी केला आहे. दरम्यान त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी देखील राऊत यांच्याबद्दल असाच दावा केला आहे. संजय राऊत हे सर्वात पहिले फुटणार होते, असं त्यांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला, शिवसेनेच्या अनेक आमदारांनी यावेळी एकनाथ शिंदे यांची साथ दिली, त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.