Bhandara Fire : घरी जाऊन मातांचं सांत्वन, उद्याच्या उद्या 5 लाख, दोषींना सोडणार नाही : राजेश टोपे

उद्याच्या उद्या मदत पोहोचवली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Rajesh Tope Comment Bhandara hospital fire)

Bhandara Fire : घरी जाऊन मातांचं सांत्वन, उद्याच्या उद्या 5 लाख, दोषींना सोडणार नाही : राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्य मंत्री

भंडारा : भंडाऱ्यातल्या जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत  दहा नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्याच्या उद्या मदत पोहोचवली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Rajesh Tope Comment Bhandara hospital fire)

ही दुर्घटना घडल्यानंतर राजेश टोपे, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली.

राजेश टोपेंची प्रतिक्रिया 

“भंडारा आगीची घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ८ मुली आणि २ मुलं अशी दहा बालकं दगावली. निष्पाप बालकं गेली. ही बालकं बाहेर जन्मली होती, मात्र जन्मत: कमी वजन आणि ऑक्सिजनचा कमी पुरवठा अशी ही बालकं होती, त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री शॉर्ट सर्किटने स्पार्क झाला आणि अचानक स्फोट झाला. काळ्या धुरामुळे काहीही दिसत नव्हतं. हा धूर बालकांच्या वॉर्डमध्येही घुसला. सात बालकांना वाचवण्यात यश आलं.”

“या घटनेची चौकशी करण्यासाठी साधना तायडे यांच्या नेतृत्त्वात समिती तयार केली आहे. यामध्ये विविध तज्ज्ञ आहेत. सहा लोकांची समिती या घटनेची चौकशी करेल,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

“झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व रुग्णालयांना खबरदारीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा जो रिपोर्ट येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्याच्या उद्या मदत पोहोचवली जाईल. आमच्या सहवेदना कुटुंबीयांसोबत आहेत. मातांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जाणार आहोत,” असं राजेश टोपे म्हणाले.  (Rajesh Tope Comment Bhandara hospital fire)

संबंधित बातम्या : 

भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

BREAKING | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली

Published On - 4:35 pm, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI